सिंधुदुर्गनगरी :
सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्गनगरी साठी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक केसरकर आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्याने महायुती सरकारच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या इमारतीचे काम मार्गी लागणार आहे.यासाठी ४२७ कोटी रुपयांची निविदा जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी २५ एकर जागेत मेडिकल कॉलेज, ५०० खाटांचे हॉस्पिटल व त्या अनुषंगिक कामे होणार आहेत. येत्या दोन वर्षात मेडिकल कॉलेजची इमारत उभे राहणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड, उपकार्यकारी अभियंता विनायक जोशी यांनी यासाठी प्रस्ताव शासनाकडे सादर केले होते.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयाच्या जागेत सुरू आहे. या ठिकाणी ५०० खाटांचे हॉस्पिटल,वैद्यकीय महाविद्यालय, मुलांचे व मुलींचे हॉस्टेल, तसेच अधिष्ठाता निवासस्थान आधीसाठी ४२७ कोटी रुपयांची निविदा जाहीर करण्यात आली आहे. एकूण दहा लाख स्क्वेअर फुटाचे बांधकाम असणार असून आवश्यकतेनुसार जुन्या इमारती टप्प्याटप्प्याने पाडून हे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या उपचार प्रक्रियेत कोणताही अडथळा येणार नाही.
जाहीर झालेली निविदा प्रक्रिया मार्च महिन्यात उघडण्यात येणार असून तोपर्यंत आचारसंहितेची शक्यता असल्याने आचार संहितेनंतर प्रत्यक्ष काम सुरू होईल तसेच हे काम दोन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी सांगितले.