You are currently viewing माझे गांव .. कापडणे

माझे गांव .. कापडणे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

माझे गांव .. कापडणे

 

“माझे गांव कापडणे असे नाही सापडणे..”

 

असे आम्ही लहानपणी म्हणायचो? अशी काय जादू आहे

या दोन शब्दात की लहानपणीच गावावरती नि:स्सीम प्रेम

जडते? माझे गाव म्हटले की कुणी ही असो, मन कसे भरून

येते नि चेहरा अभिमानाने ओसांडून घशात गहिवर व डोळ्यात

पाणी येतेच! असे मला आणखी एकदा होते, का ते माहित नाही पण राष्ट्रगीत म्हणतांना का कोण जाणे मला गहिवर

येतोच! मला वाटते मातृभुमीच्या प्रेमापोटी असे होत असावे.

म्हणून कसोटीच्या वेळी , संकटात सारे मतभेद विसरून राष्ट्र

एक होते त्याचेही कारण मातृभुमीपोटी असलेला हा प्रेमभाव

च असावा.

 

मला झेंडावंदनाचा दिवस आठवतो व त्याच वेळी आमच्यासह

सारे शिक्षक व गाव ही कसा झपाटलेला होता हे ही आठवते.

नुकतेच स्वातंत्र्य मिळालेले होते, गावा गावातून चैतन्य ओसांडत होते.मागासलेपण खूप होते पण कुठलाही दुस्वास

नव्हता की हेवादावा नव्हता.मने साफ होती. गरिबीचेही दु:ख

नव्हते.ती स्वीकारलेली होती किंबहुना हेच आपले प्राक्तन

आहे हीच भावना होती.त्यामुळे कष्टाने कमावलेल्या मीठ भाकरीत लोक सुखी होते.१५ ॲागष्ट व २६ जानेवारीला पूर्ण

गावाला जणू सण वाटत असे.शाळाशाळातून झेंडावंदनाची

जय्यत तयारी होत असे. मला आठवते पहाटे पासून शाळेत

लवकर जाण्यासाठी आमची घाई चालू असे.”लवकर उठाड बरं”चा घोषा चालू असे. विद्यार्थी तर विद्यार्थी गावकरीही शुभ्र

टोपी व शुभ्र ठेवणीतले कपडे घालून झेंड्याकडे कूच करत असत.

 

अर्थात, माझे वडिल स्वातंत्र्य सैनिक विष्णुभाऊ पाटील यांच्या

हस्तेच ध्वज फडकत असे. माझे वडिल खादीचे कडक इस्त्रीचे

कपडे घालून झेंड्याकडे निघत. लोक अदबीने अंतर राखून

पाठीमागून चालत सारे झेंड्याजवळ जमत असत.गावातील

सर्व शाळांची मुले शिक्षक रांगा करून शिस्तीत उभे असत.

सर्वत्र शांतता, आजुबाजूचे नागरिक उभे, आणि मग भाऊंनी

झेंडा फडकवतच एका सुरात जनगणमन सुरू होई. सारे

अभिमानाने फडकणाऱ्या ध्वजाकडे पहात असत. राष्ट्रगीत

संपताच झंडा उॅंचा रहे सुरू होई.झेंडा गीत संपताच सुरू होई

विष्णुभाऊंचे दमदार भाषण. सारा गाव व विद्यार्थी शिक्षक

पालक मन लावून ते स्फुर्तिदायी भाषण कानात प्राण आणून

ऐकत असत.भाषण संपताच सुरू होई प्रभात फेरी. सारी मुले

खुशीत प्रभात फेरीत सामील होत व घराच्या दारात उभे राहून

आया व पालक आपल्या मुलांचे हसरे चेहरे पहात गालात

खुदूखुदू हसत लेकरांचे कौतुक करत उभे असत.दारादारात

सडा रांगोळ्या काढलेल्या असल्यामुळे अंगणही खुशीत

हसत असे.अशा या दिवशी ज्या मुलांना परिस्थितीमुळे शाळेत

जाता येत नाही अशा मुलांना फार वाईट वाटत असे व ते कडेने

केविलवाणा चेहरा करून ती मिरवणूक बघत असत.

 

प्रभात फेरी संपताच मुले आपापल्या शाळेत धूम ठोकत.

तिथून सुरू होई मग ग्रामसफाई. आम्ही सारी मुले हातात खराटा घेऊन गल्ल्या झाडायला सुरू करत असू. गांवकरी

मात्र गंमत बघत असत जसे ह्या सफाईशी त्यांचा काही संबंधच नाही.तास दोन तास सफाई झाल्यावर आम्ही शाळेत

जमा होत असू कारण आम्हाला स्वातंत्र्य दिनाचा खाऊ मिळत असे.त्याचे आम्हाला खूप अप्रूप असे.खाऊ हातात पडला की

हसत हसत घरी धूम ठोकायची व घरी तो मुठीतला खाऊ

दाखवायचा.कधी कधी या दिवशी शाळेत कुणीतरी मोठा

देशभक्त पाहुणा बोलावलेला असे त्या दिवशी फार मजा असे.

 

एकदा मला आठवते, वडिलांच्या विनंतीवरून एकदा शंकरराव देव

आले होते. शंकरराव म्हणजे मोठे गृहस्थ. साऱ्या गावात उत्साह

संचारला. आणि मग पिठलं भाकरी बनवायचा कार्यक्रम ठरला.शाळे मध्ये हीऽऽऽऽऽ धुम्म उडाली.शाळे बाहेर बायकांनी

चुली पेटवल्या. पुरूषांनी भली मोठी पातेली आणली.घासुन पुसून साफ केली.पिठल्याचे बेसन आले. कांदे मिरच्या, हिर्वीगार ताजी घमघमीत कोथिंबीर आली नि सर्वत्र पिठल्याचा

दरवळं सुटला, खमंग सुवासाने सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटले

नि मग बसल्या पंगती गरमागरम पिठले व भाकरी खायला. वाह वा! अमृता पेक्षाही चवीचे ते अन्न खातांना सर्वांच्या चेहऱ्यावर तृप्ततेचे गोड भाव होते.कृतज्ञता व धन्यता ओसांडून

वहात होती.अशा कामांना स्वच्छेने स्वयंसेवक पुढे येतात व हातोहात कामे होतात, त्यामुळे कंटाळा यायचा प्रश्नच नसतो.

 

एकदा आमच्या मराठी मुलींच्या शाळेत कोणी अशा मोठ्या बाई आल्या होत्या.मला आता नाव आठवत नाही.मी चवथी

किंवा पाचवित असेल तेव्हा.मग काय आधीच शाळा चकाचक

केली.बाई शिक्षिका मुलींसाठी जेवण, पैकी मला फक्त नारळी भात आठवतो.आम्ही पहात होतो, आमच्याच घरून

आणलेल्या भल्या मोठ्या पातेल्यात बाईंनी तूप टाकले व त्यात काही लवंगा टाकल्या व नारळ साखर तांदूळ घालून

भला मोठा पातेले भरून भात शिजवला. अजून काय होते ते

आठवत नाही. टेबल साठी टेबलक्लॅाथही आमच्या घरून आणले जात. मला आठवते आम्हा मुलींची पंगत बसली पण

माझ्या घशात काही तो भात उतरला नाही. मग भांडीकुंडी

शिपाई बाई कडून घासवून घेऊन शिपाई बाईसह पातेले

डोक्यावर घेऊन घरी आणण्याची जबाबदारी माझीच असे.

नाही तर अक्का रागवायची.

 

खरेच बघा, जे जे मी डोळ्यांनी पाहिले, अनुभवले ते सारे मला

लख्ख आठवते, ते चित्र डोळ्यांनी पहातच मी लिहित असते.

छोटी गावे, चांगले संस्कार,एकोपा, सद् भाव, राष्ट्रप्रेम या

साऱ्याच भावनांचा परिपोष आमच्यात झाला. तेच संस्कार

रूजले, मुरले व आमच्या सारख्या संस्कारीत पिढ्या निपजल्या

ज्यांनी उत्तम प्रकारे विद्यार्थी घडवून देशसेवा केली. देशसेवा काय फक्त सीमेवर जाऊनच करता येते काय? नाही हो नाही,

घरी बसून आपले अंगण घर परिसर गाव स्वच्छ ठेवणे म्हणजे

देशसेवाच आहे.घर स्वच्छ, गाव स्वच्छ, गावे स्वच्छ, शहरे स्वच्छ म्हणजे माझा देश स्वच्छ, हो की नाही?तुम्ही घरी दारी

ॲाफिसमध्ये काम करतांनाही देशसेवा करू शकता.अहो,

ॲाफिसमध्ये पूर्णवेळ मनलावून काम करणे देशसेवाच नाही का?देशसेवेला कसले ही बंधन नाही, हवी फक्त तीव्र इच्छा!

मग चला, सारे मिळून देशासाठी चांगले काम करू हीच

आपली आजची प्रतिज्ञा.. करताय ना तुम्हीपण…?

 

धन्यवाद मंडळी…

जयहिंद.. जय महाराष्ट्र…

 

आपलीच,

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा