पालघर (गुरुदत्त वाकदेकर) :
जिल्ह्यातील आदिवासी पाड्यातील सकवार या जिल्हा परिषद शाळेत जाणीव चॅरिटेबल ट्रस्टने “शिक्षणाची गाडी आली” या उपक्रमाअंतर्गत “बाल-कला आणि क्रीडा महोत्सव २०२३-२४”चे आयोजन केले होते. आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी तसेच शिक्षणाचे महत्त्व समजावे हाच या उपक्रमाचा मुख्य हेतू होता.
दिनांक ९ आणि १० फेब्रुवारी अशा दोन दिवसीय उपक्रमात पहिल्या दिवशी सकाळी शालेय विद्यार्थ्यांच्या अल्पोहारानंतर उद्घाटन समारंभ पार पडला. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र परब, प्रशासकीय व्यवस्थापक सुनील पाठक, शाळेचे मुख्याध्यापक आनंद राऊत, माजी शिक्षक जलाराम भोंगे, साठये महाविद्यालयाच्या (स्वायत्त) राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) कार्यक्रम अधिकारी श्री. बोंबे, माजी जिल्हा समन्वयक विनोद गवारे, सकवार ग्रामपंचायतचे सदस्य आणि इतर मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरूवात करण्यात आली.
रामचंद्र परब यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना शिक्षणाचे तसेच खेळाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व स्पष्ट केले तर सुनील पाठक यांनी क्रीडा महोत्सवाच्या अटी व नियम स्पष्ट करत विद्यार्थ्यांना खिलाडूवृत्ती जपण्याची शपथ दिली. यानंतर विनोद गवारे यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून “शिक्षणाची गाडी आली” अशी उद्घोषणा करत आदिवासी पाड्यावर शैक्षणिक आणि सामाजिक जनजागृती पर रॅली काढण्यात आली.
सदर महोत्सवात क्रिकेट, खो-खो, कबड्डी, लंगडी या मैदानी खेळांसोबतच कॅरम, बुद्धिबळ, हस्ताक्षर, नृत्य अशा विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांना वाव देणाऱ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील १९८ विद्यार्थ्यांसोबतच ४० माजी विद्यार्थी आणि वीटभट्टीवर काम करणाऱ्या स्थलांतरित कामगारांच्या २८ पाल्यांनी सहभाग नोंदवला होता. सदर उपक्रमास साठये महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ४५ स्वयंसेवकांनी देखील सहाय्य केले होते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, खेळाचे साहित्य तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. यात प्रामुख्याने दोन चॅम्पियन कॅरम बोर्ड आणि क्रिकेट संच, दोन मॅग्नेटिक बुद्धिबळाचे संच, दोन बॅडमिंटनचे संच, विशेष लहान वयोगटातील मुलांच्या बैठ्या खेळाचे साहित्य तसेच शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.
दुसऱ्या दिवशी उर्वरित खेळांचे सामने तसेच पारंपारिक तारफा आणि इतर गाण्यांवर नृत्य सादर करत सांस्कृतिक कार्यक्रम शाळेच्या पटांगणात पार पडला. यानंतर जाणीव चॅरिटेबल ट्रस्टच्या ट्रस्टी आरती पाठक, अजित सातोसे, अॅड. मयूर जोशी आणि साठये महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी श्यामला गवारे, संदीप कदम या मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.
सदर उपक्रमासाठी जाणीव चॅरिटेबल ट्रस्टला साईंन पोस्ट इंडिया या कंपनी तर्फे सीएसआर फंड मधून आर्थिक मदत करण्यात आली होती. या कंपनीचे वरिष्ठ प्रतिनिधी अमर नडगिरी यांनी देखील कार्यक्रमास विशेष उपस्थिती दर्शवली. त्यासोबतच अनेकांच्या आर्थिक सहाय्यातून हा कार्यक्रम उभा राहिला. कार्यक्रमास ७८ वर्षांच्या माजी शिक्षिका आशालता घाणेकर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. आदिवासी पाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षकांनी आणि ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम यथासांग पार पडला. यापुढेही असेच शैक्षणिक, सामाजिक आणि लोकउपयोगी उपक्रम दुर्लक्षित सामाजिक घटकांसाठी करत राहू अशी ग्वाही जाणीव चॅरिटेबल ट्रस्टच्या ट्रस्टी आणि स्वयंसेवक नुपूर गोसावी, वैष्णवी परब, यश चकोर, स्वप्निल पाठक, ध्रुव कदारा, राजेंद्रकुमार घाणेकर, त्रिवेणी नडगिरी यांनी दिली.