You are currently viewing कॉयर वस्तू प्रदर्शन दालनाचे केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन

कॉयर वस्तू प्रदर्शन दालनाचे केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन

उद्योजक बनण्याची वेगवेगळी दालने आत्मसात करा; अगरबत्ती, सुगंधी तेल, बांबू लागवड अशी उत्पादने घ्या; राणे यांचे आवाहन

कणकवली :

 

कणकवली प्रहार भवन येथे केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत कॉयर बोर्डाच्या वस्तू प्रदर्शन दालनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कॉयर बोर्ड चे चेअरमन डी कप्पूरामु, सेक्रेटरी जे.के. शुक्ला,मार्केटिंग झोनल ऑफिसर पी. जी. तोडकर, जनरल ऑफिसर गीता भोईर, मॅनेजर श्रीनिवास बिटलिंगु,असिस्टंट मॅनेजर गड्डम स्वामी, सेल्समन राधिका पावसकर, बाजीराव सानप, डॉक्टर सचिन बदाने, बन्सीधर भोई आदी उपस्थित होते.

उद्योजक बनण्याची मानसिकता तयार करा. जगात अशक्य काहीच नाही. काथ्या पासून बनविलेल्या वस्तूंची १८ हजार कोटी ची उलाढाल प्रती वर्षी होते. ४००० कोटी ची उत्पादने देशाबाहेर परदेशात विकली जातात. २५०० कोटीची अगरबत्ती परदेशात विकली जाते. या संपूर्ण प्रक्रियेत आपण कोठे आहोत याचा विचार केला पाहिजे. कोकणातील जनतेने या सर्वाचा फायदा घ्यावा. उद्योजक बनण्याची वेगवेगळी दालने आहेत ती आत्मसात करावी, असे आव्हान केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी यावेळी केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अपेक्षित उद्योजक घडत नाहीत. अशी खंत व्यक्त करतानाच केद्रीय मंत्री नारायण राणे यांनी २०० पेक्षा जास्त महिला कॉयर मध्ये उद्योग करण्यासाठी पुढे आल्या, याचे मला समाधान आहे. नारळ आणि कॉयर त्याच्यापासून बनविण्यात येणारी उत्पादने फारच उपयोगी आहेत. अनेक उत्पादने घेता येतात त्याचा वापर बँकेत पैसे जातील असा केला पाहिजे. यापुढे तो वापर केला जाईल अशी अपेक्षा करतो. मी ओसरगाव मध्ये महिला भवन उभारले आज घडीला तेथे अनेक फळांपासून उत्पादने बनवली जात आहेत. महिलांना स्वतःची उत्पादने घेता येत आहेत. त्याच पद्धतीने कॉयर क्षेत्रात अनेक उत्पादने घ्या आणि स्वावलंबी बना असे आवाहन केले.

चहा पत्ती पासून बनलेले तेल ९०० रुपये लिटर विकले जाते. बांबू पासून इथोनोल बनविले जाणार आहे. त्यामुळे या सर्वांचा विचार करा आणि या उद्योगात सामील व्हावा. पैसा मिळविण्याच्या मार्गाने चाला. त्यासाठी चांगला मार्ग आम्ही दाखवत आहोत त्याचा वापर करा आणि उद्योग करा. गरिबातील गरीब माणूस आज श्रीमंत झाले. रस्त्यावर कपडे विकणाऱ्या माणसाने २ हजार करोड रुपयांचे भागभांडवल केले. तुम्ही सुध्दा अशाच पद्धतीने काम करा. नोकरीवर अवलंबून राहू नका. नोकरीत १५ हजार रुपये मिळतात त्यावर अवलंबून राहू नका. धीरूभाई अंबानी यांनी १५०० रु.भागभांडवल घेवून व्यवसाय सुरू केला होता. आज त्या कंपनीचे ८ लक्ष कोटी रुपयांचे भागभांडवल आहे, असे यशस्वी व्हा. तुम्ही दोनशे लोक आहात. तुमची असोसिएशन केले जाईल. ज्यामुळे तुमचे जे प्रॉब्लेम असतील ते त्या माध्यमातून सोडवू.

मी सुद्धा व्यावसायिक आहे. रात्र शाळेत शिकलो. छोटे मोठे व्यवसाय केले. व्यवसायिक म्हणून काम करतो राजकारणातून पैसे मिळवत नाही. वडीलांच्या नावे तातू राणे ट्रस्ट केली आहे. त्यात जे व्याज येते त्यातून मुलांना शिक्षणासाठी, उपचारासाठी मदत करतो. जे माझ्यावर टीका करत आहेत ते एक रुपया तर जनतेसाठी खर्च करत आहेत काय ? असा सवाल केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा