मृत्यूचे कारण अस्पष्ट : अधिक तपास चालू
मालवण
मालवण दांडी येथील गोपाळ दत्ताराम केळुसकर ( ४७) या तरुणाचा मृतदेह आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यानजीकच्या समुद्रात सापडून आला आहे. समुद्रात तरंगणारा हा मृतदेह स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी समुद्राबाहेर काढण्यात यश मिळविले मात्र त्यांच्या मृत्यू मागील कारण समजू शकले नाही. याबाबत अधिक तपास चालू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालवण दांडी येथील गोपाळ केळुसकर यांचा पातीद्वारे मच्छीमारीचा व्यवसाय असून त्यांना दारूचे व्यसन होते. काल गुरुवारी रात्री ते समुद्र किनाऱ्यावर जातो असे सांगून घराबाहेर पडले होते. मात्र रात्र उलटून देखील सकाळपर्यंत ते घरी परतले नव्हते. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय व स्थानिक नागरिकांकडून त्यांचा शोध सुरू होता. आज सकाळी त्यांचा मृतदेह सिंधुदुर्ग किल्ल्यानजीकच्या समुद्रात पाण्यात तरंगताना दिसून आला. याबाबत मालवण पोलिसांना माहिती दिल्यावर त्यांनी पोलीस त्याठिकाणी दाखल झाले. स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने त्यांचा मृतदेह किनाऱ्यावर आणण्यात आला. मात्र त्यांच्या मृत्यू मागील नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. मोरे, पोलीस कर्मचारी सिद्धेश चिपकर हे अधिक तपास करत आहेत.