You are currently viewing ऋतू प्रेमाचा ?

ऋतू प्रेमाचा ?

*लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या लेखिका कवयित्री अचला धारप लिखित अप्रतिम लेख*

 

*ऋतू प्रेमाचा?*

 

पाश्चात्य संस्कृतीचे वारे आले आणि तरुणाई पण ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी वेगवेगळे डेज साजरे करु लागली‌. हा ठरवुन केलेल्या प्रेमाचा ऋतू म्हणायचा का? खरच असं गुलाब देऊन, मिठी मारुन प्रेम केले जाते का?

खरं तर प्रेम ही एक उत्कट भावना आहे. खूप वर्षांपूर्वी नवरा बायकोला दिवसा एकमेकांशी बोलायची पण मुभा नसायची. त्या वेळी नव-याच जेवण झालं की त्या ताटात बायको जेवायची. बायकोच्या आवडीचे पदार्थ इकडची स्वारी मुद्दामुनच जास्त घ्यायची नि पानात टाकायची. बायकोला आग्रहाने खायला घालायची मुभा नव्हतीच. मग पदार्थ पानात ठेऊन जेवणावरुन उठताना खुणेने बायकोला दर्शवल जायचं. प्रेम अशा प्रकारे व्यक्त करायचे. ती पण खुश होयची.

नंतर विचार सरणीत बदल झाला. तेव्हा नऊवारी पातळ, दागिने शृंगाराचा वेगळाच थाट होता. सुंदर रेशमी जरीकाठाचे लुगडे. त्यावर ठसठशीत सोन्याची माळ, छान कर्णफुले. एखादी बाई रुपवान असेल तर अशा वेशात अगदी मुर्तीमंत सौंदर्य पहायला मिळायचे. मग कोण श्रीमंत लोक असतील तर ते आपल्या या राणीला सोन्याची वेणी आणायचे. त्या अंबाड्यावर ही वेणी खुलुन दिसायचीच‌. पण अहोंनी हौशीनी आणली म्हणून चेहरा आणखी खुलायचा. ‘तुम्ही किती आज छान दिसतात!’ असं पती राजांनी म्हटलं की काय बाई ते लाजणं..इश्श.. तुमचं आपलं काही तरीच… हे उत्कटतेने यायचं.

नऊवारी जाऊन सहावारी आली‌. आणखी स्वातंत्र्य आलं. सिनेमाचा जमाना आला. मग एखाद्या सिनेमातल्या नायिकेची बघून नवरोजी तशी साडी बायकोसाठी आणायचे. बायकोनी ती साडी नेसली की नवरा म्हणायचा ,’ आमची हेमामालिनी बघा कशी दिसतेय?’ मग या हेमामालिनीला आपला नवरा पण क्षणभर धर्मेंद्र वाटायचा. नि ती लाजून त्याच्या मिठीत शिरायची. असेच उत्कट हग डे साजरे होयचे.

सायकलच्या जमान्यात बायकोला सायकल वरून फिरायला न्यायचे. पुढच्या दांडीवर बायकोला बसवुन फिरायला न्यायला मजा वाटायची..काही तरी थ्रिल! असं हे प्रेमी युगुल सायकल वरून जातं असलं की जनता पण बघत बसायची. मग ती लाजून गोरीमोरी होयची आणि तिचे हे रूप बघून तो देवानंद खुश होयचा. जणूकाही प्रेम करुया खुल्लम खुल्ला असं वाटायचं.

प्रेम करायला पैसाच लागतो असं नाही. एखाद्या निवांत संध्याकाळी तिला बागेत नेऊन गप्पा मारता मारता चणेवाला आला की एक पुडी घेऊन त्यातले चणे वाटून खाणे.‌.गजरेवाला आला की गजरा घेऊन तो स्वतःच्या हाताने बायकोच्या केसात माळणे…आहा काय ती बायको खुश होयची…सुख म्हणजे नक्की काय असतं? असंच तिला वाटायचं. काही रसिक नवरे प्रत्येक सणाला बायकोला गजरा आणि गुलाबाचे फूल आणायचा. वर्षभरात असे कितीतरी रोज डे साजरे होयचे.

घरात सणावाराला बायकोने खूप काम केलं याची पावती म्हणून अलगद तिच्या ओठांवर टेकलेले ओठ! तिनेही लाजत त्याला दिलेली दाद! असे बरेच किस डे साजरे होयचे.

म्हणतात ना प्रेमाला उपमा नाही

ते देवा घरचे लेणे.

अशा ह्या प्रेमाच्या क्षणांचे रेशीम बंध घेऊन आयुष्याच्या कातरवेळी ते दोघे एकमेकांना सांभाळून घेतात. तो अगदी दवाखान्यात जाताना तिचा हात धरुन सांभाळून नेतो. तिने आयुष्यभर जपलेल्या ठेवीवर जणू चक्रवाढ व्याजाने मिळालेला हा परतावाच!

 

*नको ते डेज च वारं*

*मराठमोळ प्रेम हेच खरं*

 

 

सौ. अचला धारप.

प्रतिक्रिया व्यक्त करा