राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण मागे
सावंतवाडी
रोणापाल मौजे मुख्य रस्ता ते खेरकटवाडी, भरडवाडीकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ता वाहतुकीस बंद केल्या प्रकरणी ग्रामस्थांनी आज सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ने पाठिंबा दिला होता. यावेळी भाजपच्या पंचायत समिती सभापती मानसी धुरी, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई, शिवसेना युवा नेते गुणाजी गावडे, माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनीही भेट देत पाठिंबा दिला होता. यावेळी सकाळी सुरू झालेल्या या उपोषणाला दुपारी दीड वाजेपर्यंत प्रशासनाने दखल घेतली नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी आक्रमक भूमिका घेत याबाबतचा जाब तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना विचारला होता. यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी उपोषणस्थळी जाऊन हा विषय ग्रामपंचायतचा असल्याचे स्पष्ट केले. मात्र पोलिस प्रोटेक्शन देत ते अतिक्रमण काढून टाकण्याचे आपण आदेश देतो असे सांगून उपोषण मागे घेण्याची विनंती त्यांनी ग्रामस्थांना केली आहे. यावेळी तहसीलदार यांच्या लेखी आश्वासनानंतर पुंडलिक दळवी यांनी केलेल्या मध्यस्थी नंतर ग्रामस्थांनी ते उपोषण मागे घेतले आहे.