सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर सर्व रेल्वेना थांबे न दिल्यास कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचा आंदोलनाचा इशारा
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या “सिंधुदुर्ग” रेल्वे स्थानकावर सर्व लांब पल्ल्याच्या जलद गाड्यांना थांबा मिळावा, तसेच सर्व गाड्यांचा तिकीट कोटा मिळावा अन्यथा सिंधुदुर्गातील सर्व रेल्वे स्थानकावर एकाच दिवशी तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला. तर याबाबतचे निवेदन कोकण रेल्वे प्रशासनास देण्यात आले.
कोकण रेल्वे सुरु होऊन अनेक वर्षे झाली तरी अद्याप जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांचा विकास झाला नाही. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या “सिंधुदुर्ग “या प्रमुख रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या जलद गाड्या थांबत नाहीत. येथे तिकीट कोटाही उपलब्ध नाही अशा विविध समस्या प्रवाशांना भेडसावत आहेत. जनशताब्दी, नेत्रावती, यासारख्या जलद गाड्यांना थांबा मिळत नसल्याने तसेच मांडवी, कोकण कन्या या गाड्यांचे स्लीपर डबे काढून त्याला एसी डबे जोडण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्याचा लाभ घेता येत नाही. या गाड्या आता कोकणवासीयांच्या राहिल्या नाहीत असा सूर उमटु लागला आहे. याबाबत वारंवार लक्ष वेधूनही रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. जिल्ह्यातील नागरिकांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला जात आहे. याबाबत तीव्र संताप व्यक्त होत असून याकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने आता संघर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ओरोस, रानबांबूळी, अणाव, पडवे ,गावराई, सुकळवाड, यासह विविध गावांमध्ये प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शुभम परब यांच्या अध्यक्षतेखाली बैठका पार पडल्या. या बैठकांना सर्व गावातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला असून रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शुभम परब, सचिव प्रकाश पावसकर, सल्लागार नंदन वेंगुर्लेकर, कार्याध्यक्ष नागेश ओरोस्कर, तसेच सर्व गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी झालेल्या बैठकांमध्ये कोकण रेल्वे कडून होणाऱ्या गैरसोइबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर सर्व लांब पल्ल्याच्या जलद गाड्यांना थांबा मिळावा, सर्व रेल्वे प्रवासांच्या तिकिटांचा कोटा उपलब्ध करून द्यावा ,या प्रमुख मागण्यांसह सावंतवाडी येथे टर्मिनल पूर्ण व्हावे. कोकण रेल्वे मार्गावरून केरळ राज्यात जाणाऱ्या काही गाड्यांना सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकवर थांबा मिळावा. आदी मागण्यांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील सिंधुदुर्ग सह सर्व रेल्वे स्थानक विकास कामे जलद गतीने पूर्ण करण्यात यावीत. तेथे सोयी सुविधा निर्माण कराव्यात. सध्या सुरू असलेल्या विकास कामांना गती द्यावी. यासाठी रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने रेल्वे प्रशासनास निवेदन सादर करुन लक्ष वेधण्यात आले. तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या व मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास व सिंधुदुर्ग रेल्वे स्थानक वर सर्व लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा न मिळाल्यास तीव्र जन आंदोलन उभारण्याचा निर्णय यावेळी रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने घेण्यात आला.