You are currently viewing मा.महसूल मंत्री मा.श्री.बाळासाहेब थोरात यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त

मा.महसूल मंत्री मा.श्री.बाळासाहेब थोरात यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त

*बाळासाहेब थोरात जसे दिसले तसे..!*

 

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा स्टेशन वरील गोष्ट.मा. श्री बाळासाहेब थोरात हे गाडीतून उतरताच मी त्यांना माझे श्री संत गाडगेबाबा यांच्यावर लिहिलेले पुस्तक सप्रेम भेट दिले .माझे पुस्तक हातात पडताच व मुखपृष्ठावरील गाडगे महाराजांचा फोटो पाहताच बाळासाहेबांचा चेहरा प्रसन्न झाला. त्यांनी ते पुस्तक कपाळाला लावले आणि मला म्हणाले श्री संत गाडगेबाबा हे माझे दैवत आहेत. वीस वर्षांपूर्वी मा. बाळासाहेब थोरात यांचा परिचय झाला तो असा. त्याला कारणीभूत श्री संत गाडगेबाबा ठरले.त्याचे असे झाले की श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व मा. मंत्री मा. श्री हर्षवर्धन देशमुख यांच्या मुलीचे लग्न होते . त्या लग्नासाठी मा. ना.श्री बाळासाहेब थोरात येणार होते. त्यांना रिसीव करण्याची जबाबदारी माझे मित्र श्री नितीन अण्णासाहेब हिवसे यांच्यावर होती. त्यासाठी श्री.नीतीन हिवसे यांनी मला सोबत घेतले होते. आम्ही बडनेरा रेल्वे स्टेशनवर बाळासाहेबांना रिसीव करायला गेलो. बाळासाहेबांची पहिली भेट झाली ती अशी. लग्न सायंकाळचे होते .बाळासाहेब येणार म्हणून वरूडचे माजी आमदार श्री नरेशचंद्र ठाकरे यांनी मोर्शी मतदार संघात सकाळी बाळासाहेबांचा एक कार्यक्रम ठरविला होता. बडनेरा रेल्वे स्टेशनवरून आम्ही अमरावतीला आलो .बाळासाहेब विश्राम भवनात तयार झाले. बाळासाहेबांबरोबर मी वरुडला निघालो .या आमच्या प्रवासामध्ये खूप गप्पा झाल्या. बाळासाहेब तेव्हा पाटबंधारे मंत्री होते. मागे साधारणपणे पंधरा वर्षापूर्वी नगरला मराठा सेवा संघाचे अखिल भारतीय अधिवेशन होते .मी त्या अधिवेशनाला गेलो होतो .बाळासाहेबही आले होते .त्यांचे गाव संगमनेर तिथून जवळच होते.अधिवेशनातील कार्यक्रम झाल्यानंतर मी बाळासाहेबांना भेटलो आणि त्यांनी मला त्यांच्या गाडीत बसविले.आम्ही अहमदनगरला विश्राम भवनात आलो. बाळासाहेब म्हणाले चला माझ्या गावाला संगमनेरला. मी होकार भरला .मी आणि बाळासाहेब कारमध्ये मागे बसलो .तेवढ्यात मागच्या दाराजवळ मा. ना. चंद्रकांत हंडोरे आले.बाळासाहेबांना म्हणाले .मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे .बाळासाहेब म्हणाले चला वेळ असेल तर संगमनेरला जाऊन येऊ. वाटेत बोलणे होते. हंडोरे साहेबांनी संमती दिली. मी गाडीतून उतरायला लागलो. मागे अडचण नको म्हणून मी उतरत होतो. तसेच मला बाळासाहेबांनी थांबवले. काठोळे तुम्ही माझे पाहुणे आहात. तुम्ही मागेच बसा. आपण तिघेजण मागेच बसू .मला नवल वाटले. तेव्हा आजच्यासारख्या अपटूडेट गाड्या नव्हत्या. साध्या कार होत्या .पण त्याही गाड्यांमध्ये दोन मंत्र्यांबरोबर संगमनेरला आम्ही गेलो. संगमनेरला गेल्यावर बाळासाहेबांनी त्यांचा एक स्वीय सहाय्यक माझ्याबरोबर दिला. कारखाना .दूध उत्पादन संघ .शाळा. कॉलेजेस सर्व दाखविले. बाळासाहेबांनी लगेच माझा मी आयएएस अधिकारी होणारच हा कार्यक्रम त्यांच्या कॉलेजमध्ये आयोजित केला. मी जेव्हा संगमनेरला दोन दिवस होतो त्या दोन दिवसात एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती ही की बाळासाहेबांचा लोकसंग्रह प्रचंड आहे .त्यांना भेटायला येणाऱ्या लोकांची गर्दी पाहिल्यानंतर एखादी छोटीशी यात्रा भरली आहे की काय ? असे वाटत होते .बाळासाहेबांच्या बद्दल दुसरा आदर यासाठी निर्माण झाला की वीस वर्ष अगोदर त्यांच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना देखील संगणकाचे पुरेसे ज्ञान होते .या माझ्या भेटीत मला बाळासाहेबांची एक गोष्ट अजून नजरेत भरली ती म्हणजे त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाची दखल घेतली जाते. कोण आलं .कोणाबरोबर आलं .काय काम होतं. त्याचा पत्ता व फोन नंबर घेतला जातो. कोणत्या अधिकाऱ्याला फोन करायचा. काम झालं की नाही एवढं सगळं टिपून घेतल्या जातं व संबंधितांना कळविल्या जातं. बाळासाहेबांच्या अपरोक्षदेखील तुमचे काम मार्गी लागते. मी महाराष्ट्रामध्ये बऱ्याच मंत्र्यांकडे फिरलो. बऱ्याच लोकप्रतिनिधीकडे फिरलो. पण अशी अद्ययावत पद्धत मला कुठेच दिसली नाही. ज्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी संध्याकाळी साखर कारखान्यांमध्ये आमचा व मा.श्री.हंडोरेसाहेबांचा सत्कार झाला . भोजन करणारे आम्ही दोघेजणच होतो .मी बाळासाहेबांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले .बाळासाहेब म्हणाले काठोळे आमच्याकडे रोज पाहुणे असतात. मी आणि आमचे संचालक रोज इथे जेवायला लागलो तर कसे होईल ? आम्ही आमच्याकडे घरीच जेवतो. फक्त पाहुण्यांना साखर कारखान्यात जेऊ घालतो .किती हा दूरदर्शीपणा. नाहीतर आपण पाहतो अनेक लोकप्रतिनिधींच्याकडे जेवणावळी सुरू असतात .पण बाळासाहेब त्याला अपवाद आहेत.संगमनेरचा पूर्ण परिसर दुसऱ्या दिवशी पाहून झाला .हा परिसर पाहत असताना एक गोष्ट मला जाणवली बाळासाहेबांचे सगळे अधिकारी-कर्मचारी निष्ठावंत आहेत .बाळासाहेबांची एकनिष्ठ आहेत. त्यांचा कारखाना ज्यांनी मला दाखवला त्याची ड्युटी संपली होती .तरीपण त्यांनी दोन तास मला साखर कारखाना दाखवला. कुठे कुरकुर केली नाही .खेडेगावांमध्ये मी दूध संकलन केंद्रावर पोहोचलो तर तिथला चतुर्थ श्रेणी कर्मचारी इतका तल्लख होता समोरचा माणूस पाहिला की त्याचे नाव त्याला पाठ होते.संगणकवर तो नाव न विचारताच नाव टाकत होता आणि दूध संकलित करीत होता. दुसऱ्या दिवशी मी जायला निघालो. बाळासाहेबांचा निरोप घ्यायला गेलो. बाळासाहेब लोकांशी चर्चा करीत होते .पण मला सोडायला दारापर्यंत आले आणि परत येण्याचे निमंत्रण दिले. मा. मंत्री श्रीमती वसुधाताई देशमुख यांनी त्यांच्या कार्यक्रमाला बाळासाहेबांना बोलावले होते. बाळासाहेबांना मी रिसीव केले. बाळासाहेब विश्राम भवनात थांबले. त्यांनी ताईंना फोन केला. वसुधाताईंना तयार व्हायला वेळ होता. बाळासाहेब मला म्हणाले चला वेळ आहे तर तुमच्या डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीला भेट देऊ. ध्यानी मनी नसताना आमच्या घरात सुरु असलेल्या ग्रंथालयाला व अभ्यासिकेला भेट द्यायला आले .भेट दिली. विद्यार्थ्यांशी भेटले .स्पर्धा परीक्षेवर मार्गदर्शन केले. आमच्या सौभाग्यवती विद्या काठोळे यांची व मुलींची भेट घेतली आणि गेल्यानंतर आठवण ठेवून न चुकता ग्रंथालयासाठी स्पर्धा परीक्षांची पुस्तके पाठवली .बाळासाहेब थोरात हे एकमेव लोकप्रतिनिधी आहेत ज्यांनी स्वतःहून आमच्या डॉ पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीला पुस्तकांची अमूल्य अशी भेट दिली आहे. मध्यंतरी एका कामानिमित्त मी संगमनेरला गेलो .बाळासाहेब दौऱ्यावर निघाले होते. मी कामाचे स्वरूप सांगितले. ते म्हणाले .मी आता दौऱ्यात आहे .रात्री परत येईल. उद्या सकाळी दहा वाजता तुम्ही माझ्या कार्यालयात या. तुमचे काम होऊन जाईल .आणि पी.ए.ला म्हणाले प्राध्यापक साहेब माझे पाहुणे आहेत .त्यांची थांबायची आणि जेवायची व्यवस्था करा .दुसऱ्या दिवशी पावणेदहा वाजता माझा फोन खणखणला. बाळासाहेब थोरात यांच्या स्वीय सहाय्यकाचा फोन होता. बाळासाहेब आलेले आहेत .तुम्ही लवकर कार्यालयात या .मी कार्यालयात गेलो. बाळासाहेबांना काम समजून सांगितलं. त्यांनी ताबडतोब पत्र करून दिलं आणि त्या पत्रावर सही करूनच ते पुढच्या प्रवासाला गेले .काल-परवाची गोष्ट . मागे नवीन मंत्रीमंडळ स्थापन झालं होतं. सुरुवातीला फारच कमी मंत्री घेण्यात आले होते. बाळासाहेबांचं अमरावतीला आगमन झालं. मी त्यांच्यावर लेख लिहिले .ते घेऊन व आमच्या डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या विद्यार्थ्यांना घेऊन मी विश्राम भवनात आलो .बाळासाहेबांची वाट पाहत होतो .सर्व राजकीय नेते पोर्चमध्ये थांबले होते .मी मात्र थोडा बाजूला होतो .आणि योगायोग असा की बाळासाहेबांची गाडी नेमकी माझ्याजवळच थांबली. मी बाळासाहेबांना उतरल्याबरोबर वर्तमानपत्रांची कात्रणे द्यायला लागलो .तर ते मला म्हणाले मी प्रवासातच तुमचा लेख वाचला आहे. आम्ही आत कक्षात जाताच मी माझ्या सगळ्या आय.ए.एस करणाऱ्या विद्यार्थ्यांची ओळख करून दिली. त्यांच्याबरोबर फोटो काढले. आजूबाजूला भरपूर लोक असतांना बाळासाहेबांनी मला व आमच्या आयएएस करणाऱ्या विद्यार्थी वर्गाला प्राथमिकता दिली होती. केवढा हा मनाचा मोठेपणा. माझ्या मी लातूरला असताना मा.ना.बाळासाहेब थोरात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला येणार असल्याचं मला माहीत पडलं. माझे मित्र श्री एकनाथ डवले ते लातूरला जिल्हाधिकारी होते. तर दुसरे मित्र श्री प्रवीण गेडाम हे जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते .मी विश्राम भवनात गेलो .मला स्वीय सहाय्यक यांनी सांगितले. साहेब अल्पोपहार करीत आहेत. कदाचित माझा आवाज बाळासाहेबांनी ओळखला असावा .त्यांनी पी.ए.ला सांगून मला आतमध्ये अल्पोपहारासाठी बोलावलं .मागे नागपूर अधिवेशनाच्या वेळेस मी बाळासाहेबांना भेटायला गेलो .बाळासाहेब मा.ना. अनंतराव थोपटे यांच्याबरोबर जेवण करीत होते .पडद्यातून कदाचित मी त्यांना दिसलो .त्यांनी लगेच मला बोलावले. आणि जेवण करायला बसवले .केवढा हा मनाचा मोठेपणा. बाळासाहेबांचे हे मोठेपण त्यांच्या वागण्यात आहे. त्यांच्या कर्तृत्वात आहे .त्यांच्या कृतीत आहे. परवा माननीय नामदार वर्षाताई गायकवाड यांनी माझा एक भव्य कार्यक्रम धारावीला आयोजित केला होता .मी मुंबईला मुक्कामी होतो. मी बाळासाहेबांचा फोन केला .त्यांच्या सचिवांनी तो उचलला.

बाळासाहेब नुकताच कोरोनातून बाहेर आले होते .मी भेटायला येऊ का विचारले. लगेच होकार मिळाला. मी पेडर रोडला त्यांच्या रॉयल स्टोन बंगल्यामध्ये गेलो. योगायोगाने बाळासाहेब कुणाला तरी सोडायला कार पर्यंत आले होते .मी त्यांना दिसताच त्यांनी लगेच मला त्यांच्या चेंबरमध्ये बोलावले .माझ्या मिशन आयएएस बद्दल चौकशी केली .माझ्याबरोबर माझा आयएएस करणारा विद्यार्थी प्रशांत भाग्यवंत मिशन आयएएस शाखेचा मुंबई शाखेचे अध्यक्ष सिद्धेश शेंगळे हे पण होते. त्यांची ओळख करून दिली .बाळासाहेबांना पुस्तके सप्रेम भेट दिली. मला नवल वाटले मी त्यांच्याशी बोलत असताना बाळासाहेब खाली बसले नाहीत. आमचे जे चार पाच मिनिटं बोलणे झाले .त्यावेळेस ते पूर्ण उभे होते. माझ्याशी चर्चा करीत होते .खरं म्हणजे ते कोरोना तून नुकतेच बाहेर पडले होते .परंतु त्यांनी जो सन्मान दुसऱ्याला देऊ केलेला आहे तो शब्दातीत आहे .आणि म्हणूनच आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये तसेच महाराष्ट्रात बाळासाहेब थोरात या नावाचा चांगला दबदबा आहे आहे .आता बाळासाहेब 70 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत .भाऊसाहेब थोरात यांचा वारसा समर्थपणे ते राबवत आहेत .यांच्या आम्हाला सार्थ अभिमान आहे .असा संपन्न समृद्ध विनयशील व कृतिशील नेता महाराष्ट्राला मिळाला हे खरोखरच चांगली गोष्ट आहे .बाळासाहेबांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!

 

प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे

संचालक मिशन आयएएस

अमरावती 9890967003

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा