You are currently viewing इंग्लंडच्या ‘बैजबॉल’ वर भारतीय गोलंदाजांनी केली मात

इंग्लंडच्या ‘बैजबॉल’ वर भारतीय गोलंदाजांनी केली मात

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

 

विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडचा १०६ धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत पुनरागमन करत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. इंग्लंडने पहिली कसोटी २८ धावांनी जिंकली. मात्र, दुसऱ्या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या बैजबॉलवर मात केली. ‘बैजबॉल’ म्हणजे इंग्लंडच्या आक्रमक फलंदाजीची शैली. तिसरी कसोटी १५ फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवली जाणार आहे.

 

भारताने इंग्लंडसमोर ३९९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात इंग्लिश संघाचा दुसरा डाव २९२ धावांवर आटोपला. यशस्वी जैस्वालच्या द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात ३९६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात २५३ धावा करून सर्वबाद झाला. भारताला पहिल्या डावात १४३ धावांची आघाडी मिळाली होती.

 

गिलच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने दुसऱ्या डावात २५५ धावा केल्या आणि इंग्लंडसमोर ३९९ धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर भारताने इंग्लिश संघाला २९२ धावांत गुंडाळून सामना जिंकला. भारताच्या वतीने फलंदाजीमध्ये यशस्वी आणि शुभमन यांच्यानंतर गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विनही चमकले. या दोघांनी इंग्लंडच्या दुसऱ्या डावात प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.

 

इंग्लंडने चौथ्या दिवशी एका विकेटवर ६७ धावांवर खेळण्यास सुरुवात केली. रविवारी बेन डकेट २८ धावा करून बाद झाला. अक्षर पटेलने सोमवारी संघाला पहिला धक्का दिला. त्याने नाईट वॉचमन रेहान अहमदला पायचीत बाद केले. रेहान २३ धावा करू शकला. यानंतर अश्विनने ऑली पोप (२३) आणि जो रूट (१६) यांना तंबूमध्ये पाठवले. क्रॉलीने एक बाजू लावून धरली. त्याने अर्धशतक झळकावले.

 

त्यानंतर जॅक क्रॉली आणि जॉनी बेअरस्टो यांनी ४० धावांची भागीदारी केली. ही भागीदारी उपाहारापूर्वी कुलदीपने मोडली. कुलदीपच्या फिरकीची जादू चालली आणि त्याने क्रॉलीला तंबूमध्ये पाठवले. कुलदीपचा चेंडू क्रोलीच्या पॅडला लागला. यावर कुलदीपने कर्णधार रोहितकडे डीआरएस घेण्याची मागणी सुरू केली.

 

रोहितने थोडा वेळ घेतला आणि मग रिव्ह्यू घेतला. यानंतर, पुनरावलोकनात असे दिसून आले की तिघांनाही लाल रंगाची खूण होती आणि क्रोली बाद झाला. त्यानंतर रोहितने कुलदीपला उचलून घेतले. क्रॉलीने १३२ चेंडूत ७३ धावांची खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत आठ चौकार आणि एक षटकार लगावला. यानंतर बुमराहने बेअरस्टोला पायचीत बाद केले. त्याला पाच चौकारांच्या मदतीने २६ धावा करता आल्या.

 

बेन स्टोक्स आणि बेन फॉक्स सामना फिरवतील असे वाटत होते, पण त्याचवेळी स्टोक्सला श्रेयस अय्यरने धावबाद केले. अय्यरने चेंडू थेट यष्टीवर फेकल्यामुळे स्टोक्सला तंबूमध्ये परतावे लागले. त्याला ११ धावा करता आल्या. यानंतर फॉक्सने टॉम हार्टलीसोबत ५५ धावांची भागीदारी केली. बुमराहने ही भागीदारी भेदली. त्याचा झेल बुमराहने त्याच्याच चेंडूवर घेतला. त्याला ३६ धावा करता आल्या. यानंतर मुकेश कुमारने बशीरला यष्टिरक्षक भरतकरवी झेलबाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. अखेरी बुमराहने टॉम हार्टलीला त्रिफळाचीत बाद केले आणि इंग्लंडचा दुसरा डाव २९२ धावांवर आटोपला. हार्टलेने ३६ धावांची खेळी खेळली. भारताकडून बुमराह आणि अश्विनने प्रत्येकी तीन बळी घेतले. तर मुकेश, कुलदीप आणि अक्षर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. या कसोटीच्या पहिल्या डावात बुमराहने सहा विकेट घेतल्या. एकूणच या सामन्यात त्याने नऊ विकेट घेतल्या आणि त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा