You are currently viewing कविता

कविता

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री ज्योत्स्ना तानवडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

वृत्त — पादाकुलक
*” कविता “*

नव्या भावना मनात येता
फेर धरूनी नाचु लागता
विणू लागतो गोफ तयांचा
आकाराला येते कविता ||

विषयांचे ना कसले बंधन
कवी कल्पना अचाट असते
शब्दांची मग घेत भरारी
विश्वच अवघे समोर येते ||

जळाप्रमाणे शब्द प्रवाही
मनाप्रमाणे नाचविणारे
भावमधुर तर कधी तीक्ष्णसे
विविध भावना जागविणारे ||

शब्द कुंचला सवे घेऊन
मनातील ते चित्र प्रकटता
अर्थपूर्ण अन आशयघनशी
आकाराला येते कविता ||

शब्द सागरी अमोल रत्ने
छंद वृत्त अन लयीत लिहिता
अभंग ओवी गवळण गाणी
भावमोहिनी सुरेल कविता ||

शब्द सखी ही ओढ लावते
मनात घाली सदैव पिंगा
तिच्या बरोबर खेळ रंगतो
उघळी मोहक प्रसन्न रंगा ||

ज्योत्स्ना तानवडे. पुणे

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा