रत्नागिरी-सिंधुदुर्गातील रामभक्तांसाठी अयोध्या दर्शनाचे आयोजन – प्रमोद जठार
पनवेल येथून ८ फेब्रुवारीला ट्रेन सुटणार
कणकवली
रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील सहा विधानसभा मतदारांतून प्रत्येकी अडीचशे या प्रमाणे दीड हजार रामभक्तांना आम्ही अयोध्यावारी घडविणार आहोत. त्यासाठी ८ फेब्रुवारीला पनवेल येथून विशेष ट्रेन सुटेल आणि १० फेब्रुवारीला अयोध्यानगरीत श्रीराम दर्शन घेता येईल. तसेच सकाळच्या महाआरतीमध्येही सहभागी होता येणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी दिली.
श्री.जठार म्हणाले, अयोध्या येथील श्रीराम मंदिरामध्ये नुकतीच श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापणा झाली. त्यानंतर देशभरातून भाविकांचा अयोध्या येथे ओघ सुरू झाला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गातील राम भक्तांनाही अयोध्या नगरीत जाऊन आता श्रीरामांचे दर्शन घेता येणार आहे. त्यासाठीची मोफत ट्रेनची सुविधा आम्ही उपलब्ध करून दिली आहे.
८ फेब्रुवारीला रात्री १० वाजता पनवेल रेल्वे स्थानक येथून विशेष अयोध्या ट्रेन सुटणार आहे. तर १० फेब्रुवारीला सकाळी ही ट्रेन अयोध्या येथे पोचेल. या ट्रेनचा प्रमुख प्रमोद जठार आणि स्थानिक नेते असणार आहेत. विधानसभा प्रमुख सावंतवाडी राजन तेली, कणकवली आ.नितेश राणे, कुडाळ येथून निलेश राणे, रत्नागिरी बाळ माने या नेत्यांकडे त्या त्या मतदार संघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर या इच्छुक राम भक्तांनी या ट्रेनमधून अयोध्या वारी करण्यासाठी भाजपच्या तालुकानिहाय मंडल अधिकारी तथा तालुकाध्यक्षांकडे संपर्क साधावयाचा आहे.