You are currently viewing मालवणात ४ रोजी उद्धव ठाकरे यांचे होणार जल्लोषी स्वागत – हरी खोबरेकर

मालवणात ४ रोजी उद्धव ठाकरे यांचे होणार जल्लोषी स्वागत – हरी खोबरेकर

मालवणात ४ रोजी उद्धव ठाकरे यांचे होणार जल्लोषी स्वागत – हरी खोबरेकर

शिवराजेश्वर मंदिरात शिवरायांच्या मूर्ती भोवती बसविण्यात आलेल्या दगडी सिंहासनाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

मालवण

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ४ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला येथे शिवराजेश्वर मंदिर व आंगणेवाडी येथे भराडी देवी मंदिराला उद्धव ठाकरे भेट देणार आहेत. यावेळी किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिरात शिवरायांच्या मूर्ती भोवती बसविण्यात आलेल्या दगडी सिंहासनाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे शिवसैनिकांमध्ये चैतन्याचे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे, उद्धव ठाकरे यांचे मालवण मध्ये जल्लोषी स्वागत करण्यात येणार आहे, असे ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

मालवण येथे ठाकरे शिवसेना शाखा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत तालुकाप्रमुख हरी खोबरेकर हे बोलत होते. यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नितीन वाळके, मंदार केणी, मंदार ओरसकर, वायरी सरपंच भगवान लुड्बे, सन्मेष परब, प्रसाद चव्हाण, उमेश मांजरेकर, बंड्या सरमळकर, चंदु खोबरेकर, सिध्देश मांजरेकर, पुनम चव्हाण, दिपा शिंदे,गायत्री चव्हाण ,रश्मी परुळेकर, विद्या फर्नांडिस, निनाक्षी मेतर, माधुरी प्रभु, आकांक्षा शिरपुटे, तुप्ती मयेकर, लिना मुंबरकर, अंजना सामंत, अक्षय रेवंडकर, दत्ता पोईपकर, उमेश चव्हाण, शिला प्रभु आदी उपस्थित होते.

श्री. खोबरेकर म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे ४ फेब्रुवारीला तालुक्याच्या दौऱ्यावर येत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले आहे. उद्धव ठाकरे हे २.३० वाजता मालवण शहरातील देऊळवाडा याठिकाणी येणार आहेत. तेथून तालुका शिवसेनेच्यावतीने भव्य स्वागत केल्यानंतर मोटारसायकल रॅलीने शासकीय विश्रामगृह येथे रवाना होणार आहे. भरड नाका याठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत ठाकरे यांचे भव्य स्वागत होणार आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता बंदरजेटी येथून सिंधुदुर्ग किल्ला येथे रवाना होणार आहेत. किल्ले सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिरात उद्धव ठाकरे शिवरायांना अभिवादन करून पूजा अर्चा करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातच दीड कोटी खर्चून शिवराजेश्वर मंदिराचे सुशोभीकरण झाले, तसेच आमदार वैभव नाईक यांच्या आमदार फंडातून शिवराजेश्वर मंदिरातील शिवरायांच्या मूर्ती भोवती दगडी सिंहासन बनविण्यात आले. या सिंहासनाचे लोकार्पण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असून गडकिल्ले संवर्धनाची ही एक सुरुवात आहे, असेही हरी खोबरेकर म्हणाले.

सिंधुदुर्ग किल्ला रहिवासी संघ आणि वायरी भूतनाथ ग्रामपंचायत यांच्यावतीनेही उद्धव ठाकरे यांचे स्वागत व सत्कार करण्यात येणार आहे. परतीवेळी बंदरजेटी याठिकाणी ठाकरे हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत तसेच आमदार वैभव नाईक यांच्या निधीतून दिव्यांग बांधवांना मोटारसायकलचे वाटप होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता आंगणेवाडी येथे प्रयाण करून देवी भराडी मातेचे दर्शन घेणार आहेत. यावेळी शिवसेनेच्यावतीने आंगणेवाडी येथेही स्वागत व सत्कार करण्यात येणार आहे, असे हरी खोबरेकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा