You are currently viewing राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करा…

राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करा…

ग्राहक पंचायतची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

सिंधुदुर्गनगरी

२४ डिसेंबर हा दिवस “राष्ट्रीय ग्राहक दिन” म्हणून साजरा केला जातो. दिनांक २४ डिसेंबर, १९८६ रोजी ग्राहक संरक्षण कायदा पास झाला, तेव्हापासून संपूर्ण भारतभर शासकीय पातळीवर, ग्राहक संबंधित संस्था, संघटना तसेच शाळा व महाविद्यालयांमध्ये २४ डिसेंबर हा “राष्ट्रीय ग्राहक दिन” म्हणून साजरा केला जातो.

भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी व ग्राहक कल्याण उच्चाधिकार समितीचे भूतपूर्व मंत्रिस्तरीय अध्यक्ष ग्राहकतीर्थ स्व.बिंदुमाधव जोशी यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शक तत्त्वांवर कार्यरत असलेली “ग्राहक पंचायत महाराष्ट्र” ही संस्था ग्राहक जागृतीचे पवित्र कार्य करीत आहे. मागील दहा वर्षात महाराष्ट्रातील अनेक जिल्हे व तालुक्यांमध्ये विस्तारलेली ही चळवळ निरलस, निरपेक्ष व समाजशरण वृत्तीने कार्यरत असणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांनी आपल्या खांद्यावर उचलून धरली आहे. ग्राहक संघटन, ग्राहक प्रबोधन, ग्राहकांच्या अडचणीवर मार्गदर्शन आणि प्रशासनाला सहकार्य करीत शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे कार्यकर्ते विभाग, जिल्हा आणि तालुका पातळीवर कार्य करीत आहेत. संवाद समन्वयात ग्राहक कल्याण आणि प्रशासनाचा सहकारी म्हणून संस्था कार्य करीत आहे.

दि.२४ डिसेंबर हा “राष्ट्रीय ग्राहक दिन” आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तसेच जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयांमध्ये साजरा केला जातो. काही तहसिल कार्यालयामध्ये आपल्या सोईने आणि औपचारिकता म्हणून हा दिवस साजरा केला जातो. अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या सर्वसामान्य ग्राहक राजाला जागृत करण्यासाठी शासकीय पातळीवर हा दिवस एक “राष्ट्रीय उत्सव” म्हणून साजरा झाला पाहिजे. याकामी ग्राहकाला केंद्रबिंदू मानून काम करीत असलेल्या “ग्राहक पंचायत महाराष्ट्र” या संस्थेच्या जिल्हा व तालुका शाखेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना सहभागी करुन घेतल्यास आपल्या प्रशासनाला सहकार्य करतील. त्याचबरोबर ग्राहकांशी संबंधित विविध क्षेत्रातील मान्यंवरांना आमंत्रित करून कोरोनाचे सर्व नियम पाळून हा दिवस साजरा करण्यात यावा, अशी विनंती ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य व संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रा.एस.एन. पाटील, संघटक एकनाथ गावडे व कोषाध्यक्ष संदेश तुळसणकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे मेलव्दारे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा