You are currently viewing गाव लई भारी… (माझे गाव कापडणे…)

गाव लई भारी… (माझे गाव कापडणे…)

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*गाव लई भारी… (माझे गाव कापडणे…)*

 

खरंच! किती प्रेम असतं ना आपलं आपल्या गावावर!

नोकरी निमित्त बाहेर पडलो तरी स्वप्न लहानपणची नि

गावाचीच पडतात तेव्हा मोठे नवल वाटते कि किती

रूजलेले असते गाव आपल्या नसानसात. खाऊनपिऊन

सुखी असलेल्या बऱ्यापैकी कुटुंबात जन्मलेली मी.इयत्ता

१० वी पर्यंत गावात होते. त्या नंतर पुढील शिक्षणासाठी

धुळ्याला गेले तरी कापडणे हृदयातच रूतून बसले आहे.

 

लहानपणची ती मुलींची शाळा, सहावी पर्यंत मी तिथे

शिकले. खरंच, अजिबात काही कळत नव्हते, अभ्यास

केल्याचे मुळीच आठवत नाही, तरी पास होत होते. फक्त

रिझल्टचा दिवस आठवतो.आमचा वर्ग घोळक्याने जमिनीवर

मांडी घालून बसलेला. समोर खुर्चीवर बाई बसलेल्या. आणि

त्या एकेकाचे नाव घेऊन बोलणार ..”पास कि नापास .

आमचे कान तो शब्द ऐकायला आतुरलेले. एकेक करत

सुमती पाटील ( हो, माहेरची मी पाटील) पास ऐकले की

स्वर्ग दोन बोटे! मार्काबिर्कांशी काही घेणे नव्हते. मार्कशीट

बघितलेले आठवत नाही. सुट्या लागल्या की खेळायला

मोकळे. (नंतर मी सातवी साठी गढीवरच्या नदी काठच्या

शाळेत दाखल झाले. सातवीच्या दोन तुकड्या पैकी एका

तुकडीत सर्व मुले व मी एकटी मुलगी व अत्तिशय कडक

एकनाथ गुरूजी. पण आमच्या तुकड्यांनी इतिहास घडवला

हे ही खरे आहे. १००/ टक्के निकाल व जिल्ह्यात पहिला व

दुसरा विद्यार्थी कापडणायाचा! मग काय धमाल नि मोठ्ठी

मिरवणूक व सत्कार !)

 

 

हे सगळे आठवले की किती छान वाटते. बालपण ते बालपण!

कसला ताणच नव्हता डोक्याला! आताची परिस्थिती व स्पर्धा

पाहता आम्ही खरोखर नशिबवान होतो असे वाटते.आम्ही बालपण उपभोगले असे वाटते.मधल्या सुटीत आम्ही आळीपाळीने कुणाही मैत्रिणीच्या घरी जात असू. भुक लागलेली असायची.चुलीवर गरमागरम भाकऱ्या भाजून

टम्म फुगलेली भाकरी भिंतीशी उभी रहात असे, बाजूला मोठ्या

पातेल्यात कढी तयार असे व जोडीला खलबत्यात कुटलेली

शेंगदाण्याची चटणी, त्याच्यावर तेल व कढी भाकरीचा काला

मोडून त्यावर ही तेल(तुम्ही ही खाऊन पहा, म्हणजे कळेल,

माझ्या तर आता ही तोंडाला पाणी सुटले आहे)अशा आम्ही

चार मैत्रिणी बिनदिक्कत आपले घर समजून जेवत असू व पुन्हा शाळेत हजर ! रिझल्ट लागलेला असला तरी आम्ही शाळेत जात असू व टिवल्याबावल्या करत असू.

 

पाचवी किंवा सहावी असेल, ५९/६० ची ही गोष्ट आहे, आमच्या

गावात धुळ्याहून एक डॅाक्टर बदलून आले होते. त्यांच्या

शहरात वाढलेल्या मुली आमच्या शाळेत आल्या. शहरातल्या

मुलींना गाण्याचे चांगले ज्ञान होते. आवाज मधुर होता, मग

ह्या रिकाम्या वेळेत आम्ही त्यांना गाणी म्हणायला लावत असू.

मला अजूनही त्या गाण्याच्या दोन ओळी आठवतात..

 

“ नको वाजवू रे नको वाजवू रे

कृष्ण कन्हैया देवा विनवू किती रे “

 

अतिशय सुरेल आवाजात त्या गायच्या व आम्ही मंत्रमुग्ध

होऊन ऐकत असू. गॅदरिंगलाही त्या स्टेजवर गाणी म्हणत

असत.मला आठवते, माझे वडिल गावचे, जिल्ह्याचे पुढारी

व स्वातंत्र्य सैनिक तसेच अत्यंत पुरोगामी विचारांचे होते,

त्यामुळे आमच्या घरी ग्रामोफोन होता. हॅन्डल फिरवून गोल

तबकडीवर सुई ठेवली की गाणी सुरू होत असत व सर्व

गल्ली ग्रामोफोन भोवती कोंडाळे करून बसत असे व जुनी

गाणी ऐकत असे, “राधा ना बोले ना बोले, मारी कटारी मर जाना”अशी गाणी कळत नव्हते तरी लक्षात आहेत .फार

सुंदर दिवस होते ते, असे आता वाटते.

 

वडिलांची बागायती शेती होती, अजून आहे. दोन सालदार

दोन बैलजोड्या, तांगा, असा मोठा बारदाना होता. त्या काळात

मोट तर होतीच पण कॅांक्रिटच्या घरात किर्लोस्कर ॲाईल

इंजिनही होते.ज्वारी बाजरी कपाशी भईमुगाच्या शेंगा तूर

मूग चवळी भगर तिळ अशी हिरवीगार पिके वाऱ्यावर डोलत

असत. विहिर चांगली बांधलेली, भरपूर पाणी असणारी कधी

न आटणारी अशी बारा महिने पाणी पुरवित असे. आम्ही

थाळण्यात पडणाऱ्या पाण्यात उड्या मारत असू. आई मोठ्या

लिंबाच्या झाडाखाली वरण बट्या भाजून झाडावरच्याच

हादग्याच्या फुलांची भाजी करत असे.व सालदारांसह आमची

पंगत बसे. सगळे डोळ्यासमोर दिसते आहे.

 

कधी कधी सालदार सकाळी लवकर शेतावर गेला की,

त्याचा डबा भाकरी मला १० वाजता शेतावर पायी चालत

नेऊन द्यावी लागे. ३/४ मैल सहज पायी चालण्याचे तेव्हा

कुणालाही कौतुक नव्हते ते रूटीन होते. मग एका हातात

डबा घेऊन परकर सावरत आमची स्वारी निघे मळ्याकडे.

एकटेपणा नसे कारण असे पायी जाणारे, बैलगाड्या

शेताच्या रस्त्याने भेटत व मग मी रमतगमत बाभळीवरची

सुगरणीची घरटी बघत कधी रस्त्यात बोरीखाली पडलेली

बोरे वेचत आमच्या शेताच्या बांधाबांधाने शेतात पोहचत

असे व भाकरी सालदाराच्या अंगी लावत असे.जातांना एका

शेताच्या रस्त्यावर नाला(झरा) होता. मग झऱ्याच्या पाण्यात

खेळत टाईमपास होत असे. एकदा तर भली मोठी वानरांची

टोळी उड्या मारत येतांना दिसली पण कुणालाही इजा न करता ते आले तसे गेले. नाही म्हणायला आम्ही थोडे घाबरलो

होतोच !

 

मनोरंजनाची साधने आजच्या सारखी तेव्हा नव्हती.आमचे गाव

पंचक्रोशित मोठे व पुढारलेले. नुकतेच स्वातंत्र्य मिळालेले.

माझ्या वडिलांनी ग्रामसुधारणेचा सपाटा लावलेला. त्या मुळे

निळू फुले व स्टेज कलाकारांची कलापथके गावात जनजागृतीचे कार्यक्रम सादर करत. त्यातले,

“बिनबियाचे झाड “व गाढवाचे कान “मला आठवतात. मी लहान असल्यामुळे स्टेजवरच झोपी जात असे. गावात सीताबाई…

नावाच्या महिलेची कीर्तने होत, लोक जेवण झाले की लगेच

तिकडेच जात असत. पहाटे पर्यंत कीर्तन चाले.मग वार्षिक

जत्रा, त्यात तमाशा होई , कुस्तीचा फड रंगे. आठ दिवस

यात्रा भरत असे व लोकांना विरंगुळा मिळत असे.

अलीकडे मी कानबाईच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने २/३ वेळा

कापडण्याला गेले होते पण नविन पिढी पाहून मी थोडी निराश

झाले. कोण समजावणार त्यांना?

 

 

आता मात्र गाव फार पुढारले असले तरी भ्रष्टाचाराने

पोखरले आहे. वडिल गेल्यामुळे कुणाचा दरारा नाही,

नीतिमत्ता लयाला गेली आहे हे सखेद म्हणावे लागते.

शेती लयास गेली आहे, तरूणांना फक्त दारू हवी काम

नको आहे, मजुर मिळत नाही व निसर्ग तर अजिबात साथ

देत नाही अशी परिस्थिती आहे.पण गावातील जी मुले शिकून

पुढे गेली ती ठिकठिकाणी चांगल्या हुद्यावर काम करीत

आहेत ही मोठी जमेची बाजू असली तरी नवी पिढी व्यसनाधिन

आहे, काय करावे? एकट्या पुण्यात कापडणे गावचे सात आठशे मुलं मोठ मोठ्या हुद्यांवर व इंडस्ट्रीत मालक म्हणून

काम करत आहेत. ह्या पुणेकर मंडळींनी माझे सत्ताविसावे

पुस्तक”चला कापडण्याला, (जो कापडण्याच्या क्रांतिकारकांचा इतिहास आहे.)याचे प्रकाशन मोठ्या दिमाखात पुण्यात त्यांच्या वार्षिक गेटटुगेदर कार्यक्रमात

केले.

 

असो, जमा खर्च असतातच! त्याला इलाज नाही. एक गोष्ट

मात्र खरी जे कापडण्या बाहेर पडले त्यांचे कल्याण झाले.

त्यांचे आयुष्य बदलले, त्यांची मुले ही चांगली मार्गी लागली.

हे ही नसे थोडके. “॥कालाय तस्मै नम: ॥” दुसरे काय ?

 

धन्यवाद .. थांबते.

 

स्नेहांकित..

 

प्रा. सौ.सुमती पवार UK

(9763605642)

 

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा