You are currently viewing बाल महोत्सवाचे उद्घाटन

बाल महोत्सवाचे उद्घाटन

बाल महोत्सवाचे उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी,

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, कार्यालयाच्या अधिनस्त शासकीय मुलांचे निरिक्षणगृह व बालगृह यांच्यावतीने चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओरोस येथे  दि.30 जानेवारी ते दि.2 फेब्रुवारी 2024 या कालावधीत करण्यात आलेले आहे.

या बाल महोत्सवाचे उ‌द्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अनिता कुरणे यांच्या हस्ते  चाचा नेहरु प्रतिमेचे पुजन करुन व दिपप्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ, बाल कल्याण समितीचे सदस्य अॅड. अरुण पणदूरकर, प्रा. माया रहाटे, अॅड. नम्रता नेवगी, प्रा. अमोल निर्मळे, बाल न्याय मंडळ सदस्य कृतिका कुबल, न्यू इंग्लिश स्कूल ओरोसचे मुख्याध्यापक अशोक रायबान, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओरोस प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती कसालकर, महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा समन्वय अधिकारी नितीन काळे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. बोर्डवेकर, श्रीमती श्रद्धा कदम तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओरोस व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हार्दिक शिगले आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अनिता कुरणे यांनी तीन दिवस सुरू राहणाऱ्या बाल महोत्सवातील विविध स्पर्धामुळे बालकांचा उत्साह व्दीगुणित होईल असे सांगून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी संस्थेतील निराधार, उन्मार्गी मुले व बाल संगोपन योजनेतील मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी तसेच अन्य मुले व या मुलांमध्ये एकमेकांविषयी बंधुभाव व सांघिक भावना निर्माण होण्यासाठी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. बाल महोत्सवात पहील्या दिवशी विविध क्रीडा स्पर्धा, दुसऱ्या दिवशी बालकांचे सांस्कृतिक कार्यक्रम व तिसऱ्या दिवशी बक्षिस वितरण सोहळा असे कार्यक्रम असणार आहेत. तरी परिसरातील सर्व पालक, बालक, नागरिकांनी या बाल महोत्सवास भेट देवून सर्व कार्यक्रमांचा आनंद घ्यावा तसेच बालगृहातील बालकांचा आनंद व उत्साह व्दिगुणित करावा असे आवाहन केले आहे.

बाल कल्याण समिती सदस्या प्रा. माया रहाटे यांनी लहान मुलांबरोबरच मोठ्यांनी पण तीन दिवस बालकांप्रमाणे उत्साही राहून आनंद घ्यावा, असे सांगितले व स्पर्धेत सहभागी मुलांना शुभेच्छा दिल्या.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अनिता कुरणे यांच्या हस्ते मुलींच्या खो-खो स्पर्धेचे उ‌द्घाटन करुन बाल महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मुला-मुलींचे कबड्डी, रिले स्पर्धा घेण्यात आल्या. या बाल महोत्सवामध्ये शासकीय मुलांचे निरिक्षणगृह व बालगृह सिंधुदुर्ग संस्थेतील मुले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओरोस शाळेतील मुले-मुली तसेच न्यु इग्लिश स्कूल ओरोस शाळेतील तीनशे हून अधिक मुले-मुली सहभागी झाली आहेत.

या उद्घाटन कार्यक्रमास महिला व बाल विकास विभागातील शासकिय संस्था, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, अभय केंद्र, समुपदेशन केंद्र, चाइल्ड लाईन, वन स्टॉप सेंटर या शाखातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा परिविक्षा अधिकारी तथा शासकीय मुलांचे निरिक्षणगृह व बालगृहाचे अधिक्षक बी. जी. काटकर यांनी उपस्थितांचे व मान्यवरांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा