भांडुप शहर प्रतिनिधी :
“भारतीय प्रजासत्ताक आज अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना कित्येकांनी देशउभारणीचा पाया तयार केला. त्यातून सर्वसमावेशक आपला देश दिसतो आहे” असे विद्यावैभव विद्यामंदिर शाळेच्या संचालिका गौरी सदाशिव भोईर यांनी ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण प्रसंगी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना गौरवोद्गार व्यक्त केले. यावेळी संपादक अश्विनी गाडे यांनी संपादित केलेल्या अभयारण्ये या हस्तलिखिताचे प्रकाशन पूजा समितीचे सक्रीय कार्यकर्ते नरेंद्र पवार, सामाजिक कार्यकर्ते मधुकर केणी, जेष्ठ शिवसैनिक अरविंद कोलते, जेष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर, मुख्याध्यापक जनार्दन संपतराव गोळे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अश्विनी अहिरे, डॉ. रंजना तामोरे, विनिता गावडे- परब यांच्या हस्ते करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून विद्या पवार, वर्षा केणी, भास्कर हारेर यांनी कामगिरी बजावली. सजावट कला शिक्षक सुनील मेस्त्री यांच्या कुंचल्यातून मुख्यपृष्ठ साकारले होते. यावेळी विविध स्पर्धा यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रतिथयश साहित्यिकांची पुस्तके उपस्थितीत मान्यवराच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले. रंगतदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका स्वप्ना निकम यांनी अतिशय मौलिक शब्दात केले. प्रिती सोनावणे यांनी आभार व्यक्त केले. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकांनी परिश्रम घेतले.