निगडी,प्राधिकरण-(प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर)
दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी निगडी प्राधिकरणामधील स्व. दत्तोपंत म्हसकर विश्वस्त संस्थेच्या वास्तूत ‘संस्कृत भारती’ द्वारे सर्व संस्कृत प्रेमींसाठी संस्कृत संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी पद्मश्री श्री. गिरीश प्रभुणे होते. संस्कृततज्ञ डॉ. श्री. रवींद्र मुळे आणि ज्येष्ठ संस्कृततज्ञा सौ. आशा गुर्जर यांच्या उपस्थितीत आणि दिव्यांग विद्यार्थ्यांनी केलेल्या सरस्वती स्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
या प्रसंगी ‘शिवकल्याण राजा’ या पश्चिम महाराष्ट्र प्रांताने निर्माण केलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन मुख्य अतिथींच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मंचावर पद्मश्री श्री. गिरीश प्रभुणे, ‘संस्कृत भारती’चे पिंपरी चिंचवड जनपदचे (जिल्हा) अध्यक्ष डॉ. गिरीश आफळे संयोजक नंदकिशोर वाळिंबे व रा. स्व. संघाच्या पश्चिम महाराष्ट्राचे कार्यकारिणी सदस्य हेमंत हरहरे आणि संस्कृत विद्वान डॉ. रवींद्र मुळे यांनी भूषविले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्कृत प्रेमींद्वारे ग्रंथदिंडीचे आयोजन करून संस्कृतभाषा विषयक उदबोधक घोषणा देण्यात आल्या.
वरुण रानडे यांनी रचलेले शिवछत्रपती स्तवन हे स्तोत्र गायले. नंतर भजन, दिव्यांग विद्यार्थ्याचे संस्कृत संभाषण, सरस्वती स्तवन, चिंचवड येथील ‘पुनरुत्थान गुरुकुलम’च्या विद्यार्थ्यांनी गायलेले इशावास्योपानिषद, श्लोक प्रस्तुती तसेच गीता श्लोक सामूहिक पठण, नाटिका, हास्यकणिका, कथाकथन, श्रीराम स्तुती, गीत गायन, गीत रामायणा मधील काही अंशांची प्रस्तुती , सुमधुर बासरी वादन अशा अनेक कार्यक्रमांची रेलचेल श्रोत्यांनी अनुभवली. अनेक दिग्गजांची आणि विद्वानांची उपस्थिती, ही सर्व या संमेलनाचे वैशिष्ट्ये ठरली.
मराठी भाषाशुद्धीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी रघुनाथ हणमंते यांच्याकडून ‘राज्यव्यवहारकोश’ नावाचा ग्रंथ लिहून घेतला होता, त्याची माहिती डॉ. गिरीश आफळे यांनी दिली.
गिरीश प्रभुणे आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले, “संस्कृतभाषा का शिकावी, कशासाठी शिकावी तसेच विज्ञान शिकण्यासाठी आवश्यक माहिती देणाऱ्या ज्ञानाचा मूल स्रोत संस्कृत भाषा आहे. अणुबॉम्ब बनविणाऱ्या ओपनहॅमरला संस्कृत भाषा अवगत होती, इत्यादी माहिती दिली.” डॉ. रवींद्र मुळे यांनी वेदो अखिलं मूलम् हा उपदेशमंत्र सांगितला.
द्वितीय सत्रात संस्कृत भारती द्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध आयामांचा परिचय नंदकिशोर वाळिंबे यांनी करून दिला. त्यापैकी एक आयाम असलेल्या सुभाषित पठण अभियान अंतर्गत सुभाषित पठण स्पर्धांचे जनपद स्तरावरील विजेते कु. अन्विका धर्माधिकारी (सिटी प्राइड स्कूल), वसुंधरा भोसले (संतपीठ शाळा), अद्वैत जोशी (सिटी प्राइड स्कूल), दर्शन पटांगरे ( संतपीठ शाळा), रीया रेडेकर (सिटी प्राइड स्कूल), प्रतीक छपरे (संतपीठ शाळा) ह्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच सुभाषित अभियानात समाविष्ट शिक्षकांचे कौतुक करण्यात आले.
संस्कृतभारतीच्या पिंपरीचिंचवड जनपदचे अध्यक्ष डॉ. गिरीश आफळे, संयोजक नंदकिशोर वाळिंबे, सुभाषित अभियान प्रमुख सौ.अनुराधा लाटकर, गीता शिक्षण प्रमुख सौ.मृणालिनी फडके , सरल परीक्षा प्रमुख सौ. रुपाली इनामदार, तंत्रांश प्रमुख श्री.योगेश भोपळे यांच्यासह निगडी नगर संयोजिका सौ.मनीषा राऊत, पिंपळे सौदागर संयोजिका सौ.रोहिणी केळापुरे यांचा उल्लेखनीय सहभाग होता.
शब्दरंग कला साहित्य कट्टयाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर जोशी यांनी वरील कार्यक्रम रचण्यात मोठा वाटा उचलला. संस्कृत भारतीचे अनेक कार्यकर्ते, संस्कृत प्रेमी, शिक्षक ,विद्यार्थी , संस्कृत कुटुंबे यांची उपस्थिती विशेष मोलाची ठरली. प.महाराष्ट्र प्रांत सहमंत्री श्री.मोरेश्वर देवधर यांनी त्यांच्या भाषणात कोणतीही रचना ,ग्रंथ समजून घेण्यासाठी ग्रंथाचे वाचन मूळ संकल्पना जाणून करावे ,असा मोलाचा मंत्र दिला.
शांतिमंत्राने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.