You are currently viewing एमआयटीएम अभियांत्रिकी कॉलेजमध्ये माजी सैनिकांचा सन्मान

एमआयटीएम अभियांत्रिकी कॉलेजमध्ये माजी सैनिकांचा सन्मान

एमआयटीएम अभियांत्रिकी कॉलेजमध्ये माजी सैनिकांचा सन्मान

मालवण :

भारताच्या ७५ प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (एमआयटीएम) कॉलेजमध्ये माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने प्रथमच माजी सैनिकांना ध्वजारोहणाचा मान देण्यात आला. उपस्थित माजी सैनिकांच्या वतीने सेवानिवृत्त नायक सुभेदार श्यामसुंदर सावंत यांनी ध्वजारोहण केले. यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला सेवानिवृत्त हवालदार विजय नाईक, बाळकृष्ण चव्हाण, नाईक विलास वंजारे, नाईक विठोबा सावंत हे माजी सैनिक उपस्थित होते. प्राचार्य डॉ. एस. व्ही. ढणाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आजचा दिवस हा इतिहासाचा मागोवा घेऊन विकासाच्या नव्या संकल्पना मांडण्याचा व विस्तार करण्याचा दिवस आहे, असे त्यांनी सांगितले. संस्थेचे विश्वस्त केतन कदम यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल आभार मानत सैनिकांबद्दल आदर व्यक्त केला. संस्थेचे डिप्लोमा प्राचार्य नवले सर यांनी याप्रसंगी आपले विचार मांडताना देशाच्या शिस्तीसाठी संविधानाची गरज व विद्यार्थ्यांनी भारताला कसे विकसित देश बनवायचा आहे व पर्यावरण संरक्षणाची गरज याबद्दल माहिती दिली. त्यानंतर माजी सैनिक नायब सुभेदार श्यामसुंदर सावंत यांनी बोलताना सैनिकी जीवन हे किती खडतर असते व ते घडण्यासाठी किती दिव्यातून जावे लागते, याची माहिती देऊन आपल्या २६ वर्षाच्या सेवेतील प्रसंगाचे वर्णन करताना बर्फाच्छादित जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथील अनुभव सांगितले. सैनिक हा देशाचा कणा आहे. सैनिक सीमेवर लढत असतो. त्याला त्यासाठी शारीरिक परिश्रम घ्यावे लागतात. प्रत्येकाने शारीरिक परिश्रम घेऊन आपले शारीरिक सुदृढता राखावी व देश सदृढ करावा. सैन्य दलामध्ये इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांना भरपूर संधी आहेत याबद्दल माहिती दिली. यानंतर नायक विठोबा सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तुम्हाला इतिहास बनवायचा आहे. भूगोल चांगला राहण्यासाठी सैनिक रात्रंदिवस सीमेवर लढत आहेत. त्यांचा आदर ठेवा व त्यांचा आदर्श घ्या असे सांगितले.

या कार्यक्रमात एमआयटीएम व्होकल ग्रुपचे विद्यार्थी ओंकार म्हारदळकर, रितेश पांचाळ, दीपेश परब, कविता उगले, शुभम नार्वेकर, अथर्व राणे, सिद्धेश राणे, हेमंत जिकडे या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. तसेच पुनम वालवलकर व वेदांत परब या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगबद्दलचे आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे नियोजन प्रा. प्रथमेश जठार व सहकारी यांनी केले. सूत्रसंचालन विदिशा गवस यांनी केले. तर यावेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष पाल, उपाध्यक्ष विनोद कदम, सेक्रेटरी नेहा पाल, खनिजदार वृषाली कदम यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला बोलवून सन्मान दिल्याबद्दल सर्व माजी सैनिकांनी संस्थेचे आभार मानले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा