You are currently viewing इंग्लंड दुसऱ्या डावात ३१६/६, भारतावर १२६ धावांची आघाडी

इंग्लंड दुसऱ्या डावात ३१६/६, भारतावर १२६ धावांची आघाडी

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

भारत आणि इंग्लंड यांच्यात हैदराबाद येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. इंग्लंडने जोरदार पुनरागमन करत दुसऱ्या डावात भारतावर १२६ धावांची आघाडी घेतली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लिश संघाने दुसऱ्या डावात सहा गडी गमावून ३१६ धावा केल्या होत्या. उपकर्णधार ऑली पोपने जबरदस्त खेळी करत शतक झळकावले आणि १४८ धावा करून नाबाद आहे. तर रेहान अहमद १६ धावा करून नाबाद आहे.

भारताचा पहिला डाव ४३६ धावांवर संपला. इंग्लंडने पहिल्या डावात २४६ धावा केल्या होत्या. त्यामुळे टीम इंडियाकडे १९० धावांची आघाडी होती. आता इंग्लंडने दुसऱ्या डावात ३१६ धावा केल्या असून आतापर्यंत १२६ धावांची आघाडी घेतली आहे.

अक्षर पटेलने ऑली पोप आणि बेन फॉक्स यांच्यातील ११२ धावांची सहाव्या विकेटसाठीची भागीदारी भेदली. त्याने फॉक्सला त्रिफळाचीत केले. त्याआधी अक्षरने ऑली पोपचा सोपा झेल सोडला होता. त्यावेळी तो ११० धावांवर खेळत होता. ऑली पोपने १५४ चेंडूत कसोटी कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावले.

अश्विनने इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कुकला कसोटी सामन्यात नऊ वेळा बाद केले. याशिवाय त्याने न्यूझीलंडचा यष्टिरक्षक फलंदाज टॉम लॅथम, ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि वेस्ट इंडिजचा सलामीवीर क्रेग ब्रॅथवेट यांना प्रत्येकी आठ वेळा तंबूमध्ये पाठवले आहे. रवीचंद्रन अश्विनविरुद्ध बेन स्टोक्सची कामगिरी फारशी चांगली नाही. त्याने २५ डावात केवळ २३२ धावा केल्या आहेत. या काळात स्टोक्सची सरासरी १९.३३ आणि स्ट्राइक रेट ३७.२३ होता. अश्विनने त्याला १२ वेळा बाद केले आहे.

बेन स्टोक्सने भारताविरुद्ध आतापर्यंत १७ कसोटी सामने खेळले आहेत. त्या ३२ डावात ८४९ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एक शतक आणि पाच अर्धशतके आहेत. स्टोक्सची सरासरी २७.३८ आहे. भारतीय भूमीवर गेल्या १० डावांमध्ये स्टोक्सने ६, ७०, २, ५५, २५, ६, ८, १८, ७ आणि ८२ धावा केल्या आहेत. अशाप्रकारे त्याने भारतात गेल्या १० डावांमध्ये तीन अर्धशतके झळकावली आहेत.

भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत जगातील महान फलंदाजांपैकी एक असलेल्या इंग्लंडच्या जो रूटची कामगिरी निराशाजनक होती. हैदराबाद कसोटीत रूटला केवळ ३१ धावा करता आल्या. पहिल्या डावात २९ धावा करणाऱ्या या अनुभवी फलंदाजाला दुसऱ्या डावात दुहेरी आकडाही गाठता आला नाही. दोन धावा करून तो तंबूमध्ये परतला. रवींद्र जडेजानंतर त्याला जसप्रीत बुमराहने बाद केले. बुमराहविरुद्ध रूटचा रेकॉर्ड चांगला नाही. तो १९ डावांत ७ वेळा बाद झाला आहे. दरम्यान त्याने २४५ धावा केल्या आहेत. बुमराहविरुद्ध रूटची सरासरी ३५ आहे.

२०१२ मध्ये नागपूरात भारताविरुद्ध कसोटी पदार्पण करणाऱ्या रूटने आतापर्यंत १३६ सामने खेळले आहेत. त्या २४९ डावात ११४४७ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ४९.९९ इतकी आहे. रूटने ३० शतके आणि ६० अर्धशतके केली आहेत. रुटच्या नावावर कसोटीत पाच द्विशतके आहेत. भारताविरुद्ध गेल्या दौऱ्यात द्विशतक झळकावणारा रूट सलग नऊ डावांत अपयशी ठरला आहे. भारताच्या शेवटच्या नऊ डावांमध्ये त्याची धावसंख्या २१८, ४०, ६, ३३, १७, १९, ५, ३०, २९ आणि २ धावा आहेत. त्याला एकूण १० डावात केवळ एकदाच शतक झळकावता आले आहे. रूटने भारतात एकूण ११ कसोटी सामने खेळले आहेत. त्या २२ डावात ९८३ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ४६.८० आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा