You are currently viewing मराठा आरक्षण : एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांची घेतली भेट,

मराठा आरक्षण : एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांची घेतली भेट,

*महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला; अध्यादेशाच्या मसुद्यावर चर्चा*

 

नवी मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

 

मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचे तापमान वाढले होते. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी रात्री अध्यादेशाचा मसुदा जाहीर करताना राजकारणाचे वाढते तापमान थंड केले. दरम्यान, शनिवारी आंदोलक मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली, त्यामुळे विरोधी पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे. या भेटीत दोघांनी मिळून नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. राज्य सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले उपोषण संपवत आहेत, हे विशेष.

शनिवारी वाशी येथे दोघांची भेट झाली. विशेष म्हणजे मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम असलेले अनेक आंदोलक हजारोंच्या संख्येने येथे जमले आहेत. या बैठकीची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. शुक्रवारी रात्री राज्य सरकारने अध्यादेश आणल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि जरांगे यांच्या भेटीतून अनेक अर्थ काढले जात आहेत. शुक्रवारी रात्री सरकारी अधिकाऱ्यांच्या पथकाने जरांगे यांची आंदोलनस्थळी भेट घेतली होती.

विशेष म्हणजे जरांगे यांनी शुक्रवारी आपल्या भाषणादरम्यान महाराष्ट्र सरकारला इशारा दिला होता की, जर रात्रीपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईतील आझाद मैदानावर नियोजित आंदोलनाची तयारी तीव्र करू आणि शनिवारी मुंबईत दाखल होऊ. ते म्हणाले की, आरक्षणाचा लाभ संपूर्ण समाजाला मिळेपर्यंत सरकारने आपल्या मोफत शिक्षण धोरणात सर्व मराठ्यांचा समावेश करण्यासाठी सुधारणा करावी.

आंदोलकांना संबोधित करताना मनोज जरांगे यांनी राज्य सरकारने दिलेल्या ३७ लाख कुणबी प्रमाणपत्रांची आकडेवारीही मागितली आहे. कुणबी हा एक शेतकरी समुदाय आहे, जो इतर मागासवर्गीय (ओबीसी) श्रेणीत येतो. सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे करत आहेत.

आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसींचे अधिकार आणि ओबीसींच्या सर्व सवलती दिल्या जातील, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच ते म्हणाले, ‘एक मराठा लाख मराठा’ आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही मराठ्यांनी संयमीपणे या ठिकाणी आंदोलन केलं. राज्य सरकारने तुमच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. मराठा समाजासाठी असलेल्या सर्व महामंडळांना न्याय देण्याचं काम राज्य सरकार करेल. हे सरकार मराठा समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करेल, हा शब्द मी या ठिकाणी देतो तसेच मनोज जरांगे यांचं अभिनंदन करतो. मुंबईत दाखल होण्यापूर्वीच राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनस्थळी जाऊन जरांगे यांना विजयाचा गुलाल लावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः वाशी येथे मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळी जाऊन मनोज जरांगे यांना फळांचा रस दिला. जरांगे पाटलांनी रस पिऊन उपोषण सोडलं.

 

मनोज जरांगेंच्या नेमक्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या:-

 

> जात प्रमाणपत्र वाटप करणाऱ्यांचा डाटा देणार

> सगेसोयऱ्यांना मिळणार जातप्रमाणपत्र

> राज्यभरातील गुन्हे मागे घेणार

> वंशावळी जोडण्याकरता शासननिर्णय

> शिंदे समितीला मुदतवाढ

> शिक्षणात मिळणार ओबीसीप्रमाणे सवलत

> अध्यादेशाचे आगामी अधिवेशनात कायद्यात रुपांतर केलं जाणार

प्रतिक्रिया व्यक्त करा