You are currently viewing मालवण बंदरात मासेमारी ट्रॉलरला जलसमाधी; लाखोंचे नुकसान

मालवण बंदरात मासेमारी ट्रॉलरला जलसमाधी; लाखोंचे नुकसान

मालवण बंदरात मासेमारी ट्रॉलरला जलसमाधी; लाखोंचे नुकसान

मालवण

मासेमारी ट्रॉलर समुद्रात बुडाल्याची घटना मालवण बंदरात शनिवारी घडली. ट्रॉलरवर कोणीही खलाशी कार्यरत नव्हते यामुळे मोठी दुर्घटना टळली. ट्रॉलर काही दिवसांपूर्वी मालवण बंदरात आला होता. वाऱ्यामुळे समुद्राच्या लाटांच्या तडाख्यात ट्रॉलरच्या पाठिमागील भागाकडून पाणी आत शिरल्याने ट्रॉलरला जलसमाधी मिळाली. राजकोट येथील महेश दुधवडकर यांच्या मालकीचा हा ‘महादेवेश्वर’ ट्रॉलर असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत सुमारे पंधरा लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.

स्थानिक मच्छीमारांनी ट्रॉलर वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. नामदेव सारंग, विनोद वेंगुर्लेकर, ज्ञानू खडपकर, शंकर बटाव, सागर पाटकर यांच्याबरोबर पूजा सी फुड कंपनीचे कर्मचारी ट्रॉलर वाचविण्यासाठी मदतकार्य करत होते. बॅरल बांधून ट्रॉलर समुद्रात तरंगत ठेवण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र त्यात यश येत नव्हते.

ट्रॉलरवर खलाशी नसल्याने तो नांगरून ठेवण्यात आलेला होता. आज सकाळी त्यामध्ये पाणी शिरत असल्याचे दिसून आले. स्थानिकांनी तो वाचविण्यासाठी धाव घेतली होती. मात्र ट्रॉलर काही वेळातच एका बाजूने समुद्रात बुडाला. ट्रॉलरच्या पाठिमागील भागातील फळ्यांतून पाणी आत शिरू लागल्याने पाणी इंजिनपर्यंत घुसले होते. यामुळे ट्रॉलर वाचविताही येणे शक्य झाले नाही.

दरम्यान, मालवण मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष विकी चोपडेकर यांनी मत्स्य व्यवसाय विभागाला याची माहिती दिली आहे.

WhatsAppFacebookTwitterTelegramShare

प्रतिक्रिया व्यक्त करा