विजयदुर्ग किल्ल्याच्या डागडुजीसाठी आठ कोटी रुपये देणार…
प्ररणोत्सव समितीला पालकमंत्री चव्हाण यांचे आश्वासन.
देवगड
विजयदुर्ग किल्ल्याच्या दर्या बुरुजासह, हनुमंत बुरुज, गणेश बुरुज आणि याशी संबंधित तटबंदी यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग यांच्या अपेक्षित अंदाजपत्रकानुसार ८ कोटी रुपयांचा निधी पुरातत्व खात्यास देण्याचे ठोस हमी ना. रवींद्र चव्हाण यांनी प्रजासत्ताकदिनी किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या पदाधिकार्याना दिली.
२२ जानेवारीच्या श्री रामलल्लाच्या प्रतिस्थापनेच्यादिनी विजयदुर्गवासीयांनी दर्या बुरुज भरणीचे केलेले कार्य पालकमंत्री ना. चव्हाण यांच्या निदर्शनास आले. त्यातच समितीच्या सदस्यांनी त्यांची भेट घेऊन विजयदुर्गाचे ऐतिहासिक आणि पर्यंटनात्मक महत्व अधोरेखित केले.
यास अनुसरून ना. चव्हाण यांनी कुणकेश्वर यात्रेदिवशी विजयदुर्ग किल्ला आणि गाव पाहणी याची वेळ निश्चित केली.
प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद देवधर यांनी विजयदुर्ग किल्ला, नैसर्गिक गोदी, शिवकालीन जहाज बांधणी,काळ्या रेतीचे महत्व आणि यातून होणारा पर्यटन विकास या गोष्टी ना. रवींद्र चव्हाण यांच्यासमोर मांडल्या.
यावेळी भाजपा अध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक राजीव परुळेकर, उपाध्यक्ष शरद डोंगरे, सचिव बाळा कदम, खजिनदार यशपाल जैतापकर उपस्थित होते.