आमदार नितेश राणेंच्या मागणीला यश
कणकवली
कोकणला ७२० किलोमीटर लांबीची समुद्र किनारपट्टी लाभली आहे.किनारपट्टी असल्यामुळे येत्या काळात कोकणात जलक्रीडेला मोठा वाव आहे.त्यामुळे स्पोर्ट युनिव्हर्सिटी विधेयकात जलक्रीडेचा समावेश करावा.व कोकणात ह्या युनिव्हर्सिटीचे उपकेंद्र करावे अशी मागणी विधानसभेत भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केली होती.त्यानुसार स्पोर्ट युनिव्हर्सिटीत जलक्रीडेचा समावेश करून आमदार राणे यांची ही मागणी मान्य केली आहे.
यावेळी क्रीडा मंत्री सुनील केदार यांना ‘आता ख्रिसमस जवळच आहे मंत्रीमहोदय जर सांताक्लॉज असतील तर पुणे येथे देता तसे आमच्या कोकणाला ही द्या’ असा चिमटाही आमदार नितेश राणे यांनी अधिवेशनात काढला. जलक्रीडा या व्यवसायाकडे कोकणात तरुण मोठ्या प्रमाणे वळू लागले आहेत. यामुळे तरुणांची आर्थिक समृद्धीही होणार आहे याकडे आमदार राणे यांनी लक्ष वेधले.
श्री राणे यांच्या मागणीला अनुसरून क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी सभागृहात स्पोर्ट युनिव्हर्सिटी विधेयकात जलक्रीडेचा समावेश केल्याची घोषणा केली. त्यामुळे आ.नितेश राणे यांच्या मागणीला यश मिळाले आहे.त्याबद्दल श्री राणे यांनी ट्विट करत क्रीडामंत्री सुनील केदार यांचे आभार मानले आहेत.