पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवात सहभागी होणार आहेत. त्यामुळे २२ डिसेंबर ही तारीख विद्यापीठासाठी ऐतिहासिक ठरणार आहे. आश्चर्य म्हणजे लाल बहादूर शास्त्री यांच्यानंतर एकही पंतप्रधान अलिगढ विद्यापीठाच्या कोणत्याच कार्यक्रमात सहभागी झालेले नाहीत. १९६४ मध्ये लाल बहादूर शास्त्री हे विद्यापीठाच्या पदवीदान समारंभास हजर राहिले होते. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होतील. कोव्हिडमुळे अर्थातच मोदी हे ऑनलाईन उद्घाटन करून इतर कार्यक्रमात सहभागी होतील.
मोदींच्या हस्ते विद्यापीठाच्या नव्या गेटचं उद्घाटन, पोस्टल तिकीटाचं अनावरण, कॉफी टेबल बूकचं विमोचन पार पडणार अशी माहिती विद्यापीठाने दिलीय. कोव्हिडमुळे शताब्दी महोत्सवाचे सर्व कार्यक्रम हे ऑनलाईन होणार आहेत. मोदींचा सहभागही ऑनलाईनच असेल.
मोदींच्या सहभागामुळे विद्यापीठाच्या विकासाला मदत तर होईलच पण विद्यार्थ्यांना चांगल्या ठिकाणी नोकरी मिळण्यासही मदत होईल, असा विश्वास कुलगुरू तारिक मन्सूर यांनी व्यक्त केलाय. नरेंद्र मोदींनी शताब्दी महोत्सवात सहभागी होण्याचं निमंत्रण स्वीकारल्यामुळे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी आनंद व्यक्त केला आहे. याच कार्यक्रमात केंद्रीय शिक्षण मंत्रीही सहभागी होणार होते. राष्ट्रपती कोविंद यांनाही निमंत्रित केलं गेलं होतं, पण आता ते पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमात हजेरी लावतील.