You are currently viewing यासाठीच तुम्हाला आम्ही मतदान केले होते का.?

यासाठीच तुम्हाला आम्ही मतदान केले होते का.?

सावंतवाडीत स्थानिक भाजी व्यापारी आक्रमक

कोरोनाच्या काळात सर्वच व्यवसाय व्यापार उद्योग मेटाकुटीला आले. सावंतवाडी बाजारपेठेत गेली कित्येकवर्षे छोटी छोटी तात्पुरत्या स्वरूपाची दुकाने थाटून, तर काही दिवसा जमिनीवर मेणकापड टाकून रोजच्यारोज ताजी गावठी भाजी विक्री करायचे. त्यामुळे भाजीमार्केट मध्ये जाण्याचा रस्ता देखील अरुंद झालेला होता आणि नागरिकांना मार्केटमध्ये जाण्यासाठी असुविधा होत होती असे कारण पुढे करून सावंतवाडी नगरपालिकेने सर्व स्थानिक व्यापाऱ्यांना उठवून संत गाडगेबाबा मंडई व गवत मार्केटमध्ये बसविले होते.
कोरोनाच्या काळात बाजारपेठेत गर्दी नको म्हणून शहरातील नाक्यांनाक्यांवर भाजीपाल्याची व इतर दुकाने लागली. मार्केटचे विकेंद्रीकरण झाले. त्यामुळे बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमालीची घटली. त्याचबरोबर बाहेर बसणाऱ्या स्थानिक व्यापाऱ्यांना उचलून आत बसविल्याने भाजी मंडईत जाऊन खरेदी करण्याची मानसिकता ग्राहकांची नसल्याने स्थानिकांच्या व्यापारावर परिणाम झाला. व्यापारात होणाऱ्या नुकसानीमुळे स्थानिक व्यापारी मार्गशीर्ष महिन्यात तरी गरजेच्या वस्तू विक्री करता याव्या याकरिता बाहेर बसले असता नगरपालिका प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली.
सकाळी प्रशासन कारवाई करत असताना नगराध्यक्षांनी कारवाईबाबत उद्या निर्णय घेऊ म्हणत विषय टाळून नेला होता. परंतु दुपारनंतर पुन्हा एकदा प्रशासनाने गाडी आणत दुकाने उचलण्याचा प्रयत्न केला असता, स्थानिक व्यापारी आक्रमक झाले, त्यांनी कारवाई करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना रोखले आणि प्रश्नांचा भडिमार केला. परप्रांतीय मुस्लिमांना फळांची दुकाने बाजारपेठेत कुठेही थाटण्यास देता, त्यांचे लाड पुरवता आणि स्थानिक एक दिवस जरी व्यापार करायला बसला तर त्यांच्यावर अन्याय का करता?शहरात गल्लीगल्लीत परप्रांतीय भाजी, मासे देखील विकतात, त्यांच्याकडून कोणतीही पावती घेत नाहीत आणि स्थानिक व्यापारी रीतसर पावती करतात त्यांना व्यापार करण्यास का मज्जाव करता? शहरात एस टी स्टॅण्ड परिसरात बाहेरील व्यापारी गाडी भरून भाजी आणून विक्री करून पावती न करता निघून जातात आणि स्थानिक विक्रेत्यांना मात्र जबरदस्तीने भाजी मार्केटमध्ये बसवता. शहरात जागोजागी बसणाऱ्या परप्रांतीय व्यापाऱ्यांना उठवा अन्यथा जी कारवाई करायची असेल ती करा, आम्ही मागे हटणार नाहीत अशा प्रकारे स्थानिक व्यापाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
यासाठीच तुम्हाला आम्ही मतदान करून निवडून दिले होते काय? असा प्रश्न उपस्थित करून ज्यांना निवडून दिले तेच स्थानिकांच्या पोटावर पाय देतात असेही काही व्यापाऱ्यांनी बोलून दाखवले. सावंतवाडीतील भाजी मार्केटमधील हा वाद शमण्यापेक्षा प्रशासनाच्या भूमिकेमुळे वाढतच चालला आहे आणि त्याकडे मात्र शहरातील नगरसेवकांचा होणारा दुर्लक्ष देखील बरेच काही सांगून जातो.

प्रतिक्रिया व्यक्त करा