मालवणात प्रजासत्ताक दिनी ६५० फुट लांबीच्या राष्ट्रध्वजाची तिरंगा पदयात्रा…
मालवण
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सिंधुदुर्ग, मालवण शाखेच्या वतीने प्रजासत्ताक दिना निमित्त दि. २६ जानेवारी रोजी मालवण शहरातून ६५० फुट लांबीच्या राष्ट्रध्वजाची तिरंगा पदयात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती अभाविपचे मालवण शहर मंत्री शुभम सकपाळ व राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य शिवाजी भावसार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मालवण भरड येथे आयोजित पत्रकार परिषदेत अभाविपचे मालवण शहर मंत्री शुभम सकपाळ व राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य शिवाजी भावसार यांच्यासह कार्यक्रम प्रमुख मेगल डिसोजा व इतर विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनी सकाळी साडे नऊ वाजता मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय येथून या तिरंगा पदयात्रेस सुरुवात होऊन फोवकांडा पिंपळपार ते भरड नाका येथून बाजारपेठ मार्गे राजकोट किल्ला येथे ही पदयात्रा विसर्जित होणार आहे, या यात्रेत १० फुट रुंद व ६५० फुट लांबीचा तिरंगा घेऊन विद्यार्थी तसेच एनसीसी कॅडेट्स सहभागी होणार आहे, अशी माहिती शुभम सकपाळ यांनी दिली.
प्रजासत्ताक दिन म्हणजे सुट्टीचा दिवस अशी चुकीची संकल्पना आजच्या पिढीमध्ये वाढत आहे. म्हणून ही संकल्पना मोडीत काढण्याच्या दृष्टीने समाजात देशभक्तीचे वातावरण निर्माण व्हावे, राष्ट्रप्रेम व्यक्त करता यावे यासाठी ही तिरंगा पदयात्रा काढण्यात येत आहे. पदयात्रे द्वारे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या अनेक थोर पुरुषांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच अशी पदयात्रा होत असून यात मालवण मधील कॉलेज विद्यार्थी व तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिवाजी भावसार यांनी यावेळी केले.