शिवतेजनगर ,चिंचवड (प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर)
अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने शिवतेज नगर येथे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले . श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र शिवतेजनगर समिती यांच्या वतीने परिसरातील सर्व नागरिकांना सहभागी करून घेत विविध उपक्रम राबवण्यात आले.
शिवतेज प्रतिष्ठान, शिवतेज मित्र मंडळ, राजे शिवबा युवा मंच आदि संस्थांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवतेजनगर मधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, गणपती मंदिर आणि पंचमुखी हनुमान मंदिर या मंदिरांमध्ये होम हवन, विष्णुसहस्रनाम, भक्ती संगीत अभंगवाणी, गीत रामायण अशा कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद लाभला. परिसरातील महिला आणि लहान मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रामायणाच्या कथेवर आधारित नृत्य आणि नाटिका सादर करत सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये बहार आणली. लहान मुले व युवक-युवती रामायणातील विविध पात्रांच्या वेशभूषा करून मिरवणुकीमध्ये सहभागी झाले. श्रीरामांच्या प्रतिमेच्या भव्य मिरवणूकी मध्ये मोठ्या संख्येने अबाल वृद्ध सहभागी झाले. मिरवणूकीच्या संपूर्ण मार्गावर आणि प्रत्येक घरासमोर रांगोळी त्याचप्रमाणे भगवे झेंडे,भगव्या पताका व दिवे लावण्यात आले. विविध चौकात होणारे बारा ज्योतिर्लिंगांचे महिलांनी साकारलेले देखावे लक्ष वेधून घेत होते.
प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा मोठ्या पडद्यावर तिन्ही मंदिरात सर्वांना दाखवण्यात आला. तीन दिवस चाललेल्या सोहळ्याची सांगता पंचमुखी हनुमान मंदिरातील महाआरतीने झाली. महाआरती संपल्यानंतर सर्वांना सुमारे साडे तीन हजार जणांना पुरणपोळीच्या जेवणाचा स्वरूपात महाप्रसादाचा लाभ घेता आला.
भव्य दिव्य स्वरूपात साजरा झालेल्या या आनंद उत्सवाचे सर्वत्र कौतुक होत आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिवतेज विकास मंच यांचा संयोजनात मोलाचा सहभाग होता.