रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठना सोहळ्यानिमित्त आज वेंगुर्ले तालुका रामनामाने बनला भक्तीमय
वेगुर्ले
अयोद्धेतील राम मंदिरातील रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठना सोहळ्यानिमित्त आज वेंगुर्ले तालुका रामनामाने भक्तीमय बनला होता. विविध मंदिरांमध्ये सकाळी प्रभू श्रीराम यांचे पूजन त्यानंतर नामसंकीर्तन, भजन, कीर्तन, आरती, महाप्रसाद, असे विविध कार्यक्रम सादर झाले. तसेच अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचाही सर्वांनी लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे लाभ घेतला. त्यामुळे संपूर्ण वातावरण दिवसभर राममय झाले होते.
अयोध्या येथे रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठनेनिमित्त वेंगुर्ले तालुक्यात मंदिरांमध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडत आहेत. यानिमित्त शहरातील श्रीराम मंदिरात सकाळी पूजा आर्चा झाल्या नंतर दिवसभर अखंड राम नामाचा जप सुरू होता. मोठ्या संखेने रामभक्त व नागरिक या नामजप कार्यक्रमात सहभागी झाले होते. रवळनाथ रिक्षा स्टॅन्ड व राम भक्तांनी मिळून श्रीरामाची फेरी शहरातून काढली. आणि फेरीच्या सांगतीनंतर सर्वांना लाडू वाटप केले. यावेळी जय श्री रामाचा जयघोष करण्यात आला. श्री देव रामेश्वर मंदिरातील राम मंदिरात आकर्षक देखावा करण्यात आला होता. दरम्यान या ठिकाणी मंदिरात सकाळी पूजाअर्चा, दुपारी अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचे रामभक्त व नागरिकांसाठी थेट लाईव्ह दर्शन करण्यात आले. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडकर, बाबली वायंगणकर, देवस्थानचे रवी परब, दाजी परब तसेच कारसेवक बागलकर गुरुजी यांच्या सह मोठ्या संख्येने रामभक्त सहभागी झाले होते. यास विविध मंदिरांमध्येही धार्मिक कार्यक्रम सादर झाले.