*कुडाळ येथील अनंत मुक्ताई हॉटेलमधील पत्रकार परिषदेत दिली माहिती*
कुडाळ (प्रतिनिधी):
सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना पदाधिकाऱ्यांनी कुडाळ येथील हॉटेल अनंत मुक्ताई येथे पत्रकार परिषद घेत दि.२६ जानेवारी रोजी महावितरणच्या कुडाळ येथील मुख्य कार्यालयासमोर करत असलेल्या लाक्षणिक उपोषणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीच्या अधिकारी वर्गाची मुजोरी, उद्धट वर्तन आणि महावितरणच्या भोंगळ कारभाराबाबत रत्नागिरी येथील सीएमडी भागवत यांच्याकडे तक्रारी अर्ज देऊनही जिल्ह्यातील महावितरणच्या कारभारात अजूनही सुधारणा होत नसल्याने महावितरणच्या विरोधात लाक्षणिक उपोषणाला बसत असल्याची नोटीस दिली होती. आपल्या निर्णयाची माहिती देण्यासाठी आज जिल्हा वीज ग्राहक संघटनेने पत्रकार परिषद आयोजित करून २६ जानेवारीच्या उपोषणावर संघटना ठाम असल्याची माहिती दिली व जिल्ह्यातील वीज ग्राहकांना उपोषणाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे सदर उपोषणाला उग्र स्वरूप प्राप्त झाल्यास महावितरण कंपनी जबाबदार असेल असा निर्वाणीचा इशारा दिला.
कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट यांनी पत्रकारांचे स्वागत करून सदरचे उपोषण का करावे लागत आहे याबद्दल माहिती दिली. त्यानंतर जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर यांनी गेल्या वर्षभरात वीज ग्राहक संघटनेने महावितरणला दिलेल्या सर्व निवेदनांची सविस्तर माहिती देत वीज ग्राहक संघटनेने महावितरणचे प्रकाशगड मुंबई येथील जॉइंट सेक्रेटरी विश्वास पाठक साहेबांची घेतलेली भेट आणि झालेली चर्चा, निवेदन आदींबाबत सविस्तर माहिती देत, संघटनेने महावितरणकडे केलेल्या प्रमुख मागण्या आजपर्यंत मान्य न झाल्याने, त्याचप्रमाणे वीज ग्राहक मेळावे घेण्यासाठी होणारा विलंब, वाढीव वीज बिले, सडलेले विजेचे खांब, जुनाट ट्रान्सफॉर्मर बदलणे, जिल्ह्यातील मुजोरी करणारे चार अधिकारी अनुक्रमे कुडाळ येथील शाखा अधिकारी परब मॅडम, वेंगुर्ला येथील पावसकर, सांगेली उपकेंद्राचे सहा.अभियंता युवराज चव्हाण, बांदा ग्रामीणचे सहा.अभियंता यादव आदींचे तात्काळ निलंबन करावे आणि जिल्ह्यातील वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा व्हावा इत्यादी मागण्यांसाठी २६ जानेवारी २०२४ रोजी जिल्हा विद्युत वितरणचे मुख्य कार्यालय कुडाळ येथे एक दिवसांचे लाक्षणिक उपोषण करत असल्याची माहिती दिली. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना जर उपोषण करूनही प्रश्न न सुटल्यास येत्या ३० तारीखला होणाऱ्या जिल्हा व्यापारी मेळाव्यात सदर प्रश्न उपस्थित करून राज्याचे ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे.
या पत्रकार परिषदेसाठी जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट, जिल्हा उपाध्यक्ष दीपक पटेकर, जिल्हा समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय लाड, कुडाळ तालुकाध्यक्ष गोविंद सावंत, सचिव किरण शिंदे, तालुका उपाध्यक्षा तथा मा.नगराध्यक्षा आफ्रिन करोल, उपाध्यक्ष तथा पत्रकार भरत केसरकर, सदस्य साईनाथ आंबेरकर, द्वारकानाथ घुर्ये आदी पदाधिकारी व सदस्य त्याचप्रमाणे सर्व प्रिंट मीडिया व डिजिटल मिडियाचे पत्रकार उपस्थित होते. उपस्थित पत्रकारांचे जिल्हा वीज ग्राहक संघटनेने आभार मानले.