टेम्पो चालक-मालक संघटनेची मागणी.
कोरोनाच्या काळात सर्वच व्यवसाय मेटाकुटीला आले आहेत. बांधकाम व्यवसायही बऱ्याच प्रमाणात बंदच आहे, त्यात थोड्याफार प्रमाणात जो काही व्यवसाय सुरू आहे त्यातही स्थानिक टेम्पो, टेम्पो रिक्षा, आदींवर बाहेरून आलेल्या किंबहुना जिल्ह्या बाहेरीलच नव्हे तर राज्याच्याही बाहेरून आलेल्या गाड्यांमुळे तसेच ट्रॅक्टर मुळे अन्याय होत आहे. स्थानिक व्यावसायिकांना मिळणारे सिमेंट, वाळू, खडी, माती, सेन्टरिंग सामान इत्यादींचे भाडे हे परराज्यातून आलेले ट्रॅक्टर हिरावून नेत आहेत. त्यामुळे हजारो, लाखो रुपये कर्ज घेऊन व्यवसायात उतरलेल्या स्थानिक तरुणांवर उपासमारीची वेळ आली आहे, त्यात बँकेचे हफ्ते देखील थकीत होत आहेत.
सावंतवाडीतील अनेक बांधकाम व्यवसायिक, ठेकेदारांकडे, कर्नाटकातील लमानी मजदूर काम करत आहेत. त्यातील काही लमानी मुकादम लोकांनी शेतीच्या कामासाठी घेतलेले कर्नाटकातील खाजगी ट्रॅक्टर सावंतवाडीत आणून त्यातून बेकायदेशीर माती तसेच इतर साहित्याची वाहतूक केली जाते. या कर्नाटकातील खाजगी ट्रॅक्टर मालकांकडे माल वाहतुकीचा (Good carrier) कोणताही परवाना नसतो. तरीही त्यांच्याकडून बिना परवाना बेकायदेशीर वाहतूक केली जाते आणि यावर संबंधित विभाग, वाहतूक पोलीस कोणतीही कारवाई करत नाहीत. टेम्पो चालकांकडून वारंवार बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांना समज दिलेली आहे, तसेच संबंधित विभागाचा लक्ष वेधून देखील त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे सावंतवाडीतील टेम्पो तसेच टेम्पो रिक्षा चालक मालक संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.
माल वाहतुकीचा परवाना असलेले लोकल टेम्पो तसेच टेम्पो रिक्षा चालक हे वाहतुकीच्या परवान्यांचे पसिंगसाठी वर्षाला ४०/५०००० रुपये सरकारला भरत असतात. परंतु कसलाही माल वाहतुकीचा परवाना नसलेले कर्नाटकातील ट्रॅक्टर, टेम्पो परराज्यातून आणून स्थानिकांच्या पोटावर पाय देत मनमानिपणे व्यवसाय करत आहेत त्यामुळे कोरोनामुळे आधीच मेटाकुटीला आलेले टेम्पो, टेम्पो रिक्षा चालक मालक वाहतूक बंद ठेऊन आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
जिल्ह्यातील आरटीओ आणि पोलीस वाहतूक शाखेने संबंधित बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या टेम्पो, ट्रॅक्टर वर योग्य ती कारवाई करून स्थानिक व्यावसायिकांना न्याय द्यावा अशी मागणी टेम्पो/टेम्पो रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे.