अमरावती :
अमरावती येथे रविवार दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी मराठा उद्योग कक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन अमरावतीच्या मोर्शी रोडवरील श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मध्ये सकाळी ९:३० वाजल्यापासून संपन्न होणार आहे .दिवसभर चालणाऱ्या या अधिवेशनामध्ये वेगवेगळ्या मान्यवरांना निमंत्रित करण्यात आलेले आहे .यामध्ये ज्यांचा समावेश आहे ते खरोखरच त्या त्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्व आहेत. अगदी सनदी अधिकारी श्री उज्वल कुमार चव्हाणांचे उदाहरण जर घेतले तर एक चांगला सनदी अधिकारी कसा असू शकतो त्याचे ते मूर्तीमंत उदाहरण आहेत. आय ए एस.ची परीक्षा दिल्यानंतर व ती पास झाल्यानंतर व उच्चपदस्थ अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतरही या माणसाने आपल्या गावाची खानदेशाची साथ सोडली नाही .या खानदेशाला सुजलाम सुफलाम कसे करता येईल यासाठी त्यांनी तन-मन-धनाने प्रयत्न केले आहेत तसेच करीत आहेत व करणार आहेत. ते ज्या भागात राहतात त्या चाळीसगाव परिसरामध्ये त्यांनी तलाव व नाले खोदून तसेच नवीन तलाव व नाले तयार करून पाण्याची पातळी उंच करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. शनिवार,रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी हा माणूस मुंबईला न थांबता आपल्या गावात येतो आणि गावात येऊन सगळी यंत्रणा कामाला लावतो. त्यासाठी त्यांनी खानदेश मित्र मंडळ या संस्थेची स्थापना केलेली आहे. त्याचबरोबर आमचे मिशन आयएएस देखील त्यांनी त्यांच्या जळगाव जिल्ह्यात श्री प्रवीण पवार यांच्या सहकार्याने प्रारंभ केलेले आहे .मिशन आय ए एस च्या कार्यक्रमाला ते नियमितपणे येतात, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. ते सहज उपलब्ध होतात .त्यांनी एक लक्षात ठेवलेले आहे की माझा परिसर मी सुजलम सुफलम करणार आहे आणि त्यासाठी दुसरा कोण काय करतो त्यापेक्षा मीच काय करू शकतो हा त्यांचा संकल्प आहे .आणि तो तडीस नेण्यासाठी ते जीवापाड मेहनत करीत आहेत.अशीच जीवापाड मेहनत प्रत्येकाने केली तर तो तो भाग समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच मराठा उद्योग अधिवेशनाने त्यांना निमंत्रित करून एक सुवर्ण मध्य साधलेला आहे .मराठी उद्योग कक्षाने आयोजित केलेला हा उपक्रम अतिशय चांगला आहे .कारण दिवसेंदिवस नोकऱ्यांचे प्रमाण कमी होत आहेत .आणि नोकरीतून केव्हा कमी केले जाईल याची काही हमी राहिलेली नाही आणि म्हणून मराठी पाऊल पडते पुढे या न्यायाने हा पुढाकार आहे .मी गुजरात मध्ये जेव्हा जातो आणि माझ्या समाज बांधवांना जेव्हा भेटतो आणि त्यांनी उद्योगात केलेली प्रगती जेव्हा पाहतो तेव्हा तोंडात बोटे घालावी लागतात. मी जेव्हा त्यांना सहज म्हटले की गुजरात मध्ये आयएएस सेंटर करावयाचे आहे .तर सगळे उद्योजक मित्र एकत्र आले आणि त्यांनी २००-२०० कोटीचे पाच आयएएस सेंटर उभारले आणि चक्क पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींना उद्घाटनासाठी बोलावले. परवा आम्ही राजस्थानला असे आय ए एस सेंटर सुरू केले. उद्योजक श्री गोविंद ढोलकीया यांना बोलावले होते आणि त्यांनी स्वतः या केंद्रासाठी एक कोटी रुपयांची मोठी देणगी दिली. त्यांच्याबरोबर आलेल्या इतर उद्योजकांनी जवळपास ३७ लाख रुपयांची मोठी देणगी दिली. उद्योजक काय करू शकतात. तर चांगल्या सामाजिक चळवळीला खतपाणी घालू शकतात आणि अनेकांना रोजगार देऊ शकतात. माझ्या परिचयाचे श्री रामदास माने हे पुण्याचे उद्योजक आहेत . फार गरीब होते .पण आज ते मोठे उद्योजक आहे आणि त्यांनी केलेल्या थर्माकोलच्या मशीनरीवर आज १४ हजार लोकांना काम मिळालेले आहे. या मराठा उद्योग कक्षामध्ये दुसऱ्या अतिथी आहेत श्रीमती उज्जला हावरे .खरं म्हणजे अतिशय कणखरपणे उभे राहून यजमानांचे निधन झाल्यानंतरही खंबीरपणे उभ्या राहिलेल्या समर्थ महिला म्हणजे श्रीमती उज्वला हावरे आहेत.त्या आमच्या सुप्रसिद्ध धन्वंतरी डॉ. अनिल रोहनकर यांच्या भगिनी .त्यांचे यजमान म्हणजे अमरावती जिल्ह्यातील पथ्रोट या हावरे परिवारातील. सतीश हावरे सरांनी उद्योग जगतात फार मोठा नावलौकिक मिळवलेला होता .हावरे बिल्डर्स या नावाने मोठ्या मोठ्या इमारती नवी मुंबई परिसरामध्ये उभ्या राहिलेल्या आहेत .सतीश हावरे यांचे अकाली निधन झाल्यानंतर उज्वलाताई खचल्या नाहीत. तर वेडात वीर दौडले सात या न्यायाने फिनिक्स पक्षासारख्या उभ्या राहिल्या. आणि आज त्यांनी मुंबईसारख्या महानगरामध्ये आपल्या नावाचा एक आगळावेगळा नावलौकिक उभा करून त्यांनी या उद्योजक क्षेत्रामध्ये महिलांनी पण सहभागी झाले पाहिजे हा एक कानमंत्र दिला आहे .या मराठा उद्योग कक्षाच्या अधिवेशनामध्ये चौथ्या सत्रामध्ये ईश वेद उद्योग समूहाचे संस्थापक चेअरमन श्री संजय वायाळ पाटील यांची कामगिरी अतुलनीय आहे. मी प्रत्यक्ष त्यांच्या सिंदखेड राजा येथील फॉर्मवर व शेतावर जाऊन आलेलो आहे. त्यांची अप्रतिम नर्सरी पाहिलेली आहे .माझ्या ७० वर्षाच्या काळात इतकी सुंदर वातानुकूलित नर्सरी मी प्रथमच पाहत होतो. भारतात मी अनेक ठिकाणी फिरलो .पण इतकी सुंदर नर्सरी मी प्रथमच पाहत होतो .आज त्यांचा जगभर व्यवहार आहे .सिंदखेड राजा येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेल्या या नगरीमध्ये संजय वायाळ पाटील यांनी वातानुकूलित नर्सरी सुरू करून खऱ्या अर्थाने राष्ट्रमाता जिजाऊ यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांच्याकडे सगळ्या प्रकारची झाडे आहेत आणि या झाडांची काळजी अगदी लहान बाळाप्रमाणे घेतली जाते. एक हायटेक नर्सरी कशी असावी त्याचा एक आदर्श त्यांनी जगातील लोकांसमोर ठेवलेला आहे. आणि हा माणूस विदर्भातल्या शिंदखेड राजा सारख्या गावचा राहणारा आहे. मी त्यांच्याशी फोनवर बोललो. तेव्हा अतिशय मृदुभाषी आणि कर्तव्य तत्परता त्यांच्या ठिकाणी दिसून आली. खरं म्हणजे ही नर्सरी प्रत्येकाने पाहावी आणि त्यापासून प्रेरणा घ्यावी. खरं म्हणजे आपण मंदिरात जातो .पण मला असं वाटते की नर्सरी म्हणजे आधुनिक मंदिर आहे. या नर्सरीमध्ये जाणाऱ्या माणसाचा शेतकऱ्याचा 100% विकास झाल्याशिवाय राहणार नाही यात काही शंकाच नाही. या मराठा उद्योग कक्षामध्ये भारत गणेशपुरेचा समावेश आहे .भारत हा अमरावतीचा गल्लीबोळात राहणारा व फिरणारा .पण तो चला हवा येऊ द्या च्या माध्यमातून महाराष्ट्राच्याच नव्हे जगातल्या मराठी माणसाच्या घराघरात पोहोचलो आहे .भारत हा माझा जवळचा नातेवाईक आहे .तो माझ्या सौभाग्यवती विद्याचा आतेभाऊ आहे .माझे लग्न झाले तेव्हा तो दुसऱ्या तिसऱ्या वर्गात शिकत होता. त्याला लहानपणापासून योग्य शिकवण मिळाली .त्याचे वडील उपशिक्षणाधिकारी होते .दर्यापूरला होते अंजनगावला होते चांदुर बाजारला होते .त्यांच्याकडे शिक्षक यायचे .तेव्हाचे शिक्षक त्यांचा पोशाख त्यांचं,वागणं त्यांचं बोलणं हे भारत सगळे टीपत होता आणि ते शिक्षक गेल्यानंतर त्यांच्या नकला आमच्यासमोर करून दाखवायचा .तेव्हाचे प्राथमिक शिक्षक हे थोडे आगळे वेगळे होते .आजच्यासारखे अपडेट नव्हते. भारतने हे सगळे टिपलं आणि तो दररोज नकल करायचा आणि नक्कल करता करता तो इतका मोठा अभिनेता होईल आम्हाला स्वप्नातही वाटले नव्हते. आणि आज त्याने चित्रपटसृष्टीमध्ये जे स्वतःचे स्थान निर्माण केलेले आहे ते महत्त्वाचे आहे .चित्रपटसृष्टीमध्ये गेला तरी भारत जमिनीवरच आहे .काल मी त्याचा चला हवा येऊ द्या हा शो पहायला मुंबईला गेलो. चित्रपटाची शूटिंग सुरू होती. पण त्याही धावपळीत आमच्या अल्पोहाराची जेवणाची चहाची जाण्या येण्याची सर्व व्यवस्था त्यांने केली. अगदी अमरावतीच्या कुठल्याही कार्यक्रमाला तरी तो टाळत नाही. मी त्याला परवा म्हटले .भारत तू आता फार मोठा झाला आहेस .तुझ्यावर एक डॉक्युमेंटरी तयार करावीशी वाटते .भारत पटकन म्हणाला. हो मामा. जरूर तयार करा . डाकूची भूमिका मीच करेल . असा हा हजरजबाबीपणा .आज सोशल मीडियावर अनेक तरुणांना वाव मिळत आहे. भारतचा आदर्श त्यांनी डोळ्यासमोर ठेवला तर निश्चितच तो त्यांना दिशा देणारा राहणार आहे. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री पुरुषोत्तम खेडेकर यांच्या राष्ट्रीय पुढाकाराने तसेच अमरावतीचे युवा उद्योजक निलेश ठाकरे,सारंग राऊत यांच्या स्थानिक पुढाकाराने अमरावतीला मराठा उद्योग कक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे .हे अधिवेशन युवकांना संपूर्ण राज्याला दिशा देणारे ठरेल यात मला तरी शंका वाटत नाही. =============
*प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
माजी सरचिटणीस मराठा सेवा संघ
अमरावती .9890967003*