*श्रमिक शेतकरी संघटनेचे राज्यस्तरीय नेतृत्व उपस्थित*
आजरा (प्रतिनिधी):
शनिवार दिनांक 20 जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता आजरा येथे महाराष्ट्र राज्य श्रमिक शेतकरी संघटनेतर्फे काजू उत्पादक परिषद आयोजित करण्यात आली होती. सदरच्या परिषदेस श्रमिक शेतकरी संघटनेचे राज्यस्तरीय नेतृत्व करणारी मंडळी उपस्थित होती. यावेळी आजरा परिसरातील सुमारे 400 शेतकरी उपस्थित होते. सदर परिषदेत काजू उत्पादनाविषयीच्या वेगवेगळ्या समस्यांच्या बरोबरच काजूदराच्या हमीभाव संदर्भात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली. या परिषदेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्हा रोपवाटिका संघाचे अध्यक्ष श्री वि का सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष श्री विलास सावंत, रोपवाटिका संघाचे उपाध्यक्ष श्री विकास माडगूत, श्री सरवटे, श्री भाऊ मोरजकर, श्री नाना होडावडेकर, सिंधुदुर्ग गोव्याच्या भूमितील सर्वात मोठे काजू उत्पादक शेतकरी नितीन मावळणकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून परिषदेसाठी उपस्थित होते.
या परिषदेत बोलताना श्री नितीन मावळणकर यांनी काजू उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांची यावेळी चर्चा केली तसेच त्यावर शासनाने त्वरित हस्तक्षेप न केल्यास शेतकऱ्यांना शेती करणे परवडणारच नाही असे सांगितले तसेच किमान दोनशे रुपये हमीभाव मिळालाच हवा अशी मागणी केली. श्री विलास सावंत फलोत्पादक कंपनी सिंधुदुर्ग यांनी काजू उत्पादनांच्या वेगवेगळ्या आकडेवारीसह उत्पादन खर्चाची आणि विक्रीच्या किमतीतील तफावतीची समस्या मांडली. गोवा राज्यामध्ये तेथील मुख्यमंत्री माननीय डॉ. प्रमोद जी सावंत यांनी तेथील शेतकऱ्यांना 150 रुपये प्रति किलोप्रमाणे हमीभाव देऊन ज्याप्रमाणे दिलासा दिला आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला पाहिजे असे प्रतिपादन केले. तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ले फळ संशोधन केंद्राच्या काजू मधील संशोधनातील योगदानाच्या संबंधात ऋणनिर्देश केले.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना श्री विजय सावंत यांनी काजूदरातील उत्पादन खर्चाच्या आणि विक्रीच्या किमतीतील तफावतीमुळे शेतकरी फार मोठे अडचणीत असल्याने हमी दराबाबत शासनाने तत्काळ हस्तक्षेप करून किमान दोनशे रुपये प्रति किलो इतका हमीभाव देण्याची मागणी आकडेवारी सह मांडली.
महाराष्ट्र श्रमिक शेतकरी संघटनेतर्फे संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी आणि अध्यक्षांनी शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना काजूच्या पिकासाठी दोनशे रुपये हमीभाव मिळाला पाहिजे असा परिषदेमध्ये ठराव मांडला आणि तो आवाजी मताने मंजूर करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी एकजुटीने दोनशे रुपये हमीभाव मिळालाच पाहिजे, श्रमिक शेतकरी संघटनेचा विजय असो अशा विविध घोषणा उत्साह पूर्ण वातावरणात दिल्या. तसेच येत्या 15 फेब्रुवारीला प्रांत ऑफिसवर यासंबंधीलाक्षणिक आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आणि तसा ठराव पारित करण्यात आला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यानंतर आभार प्रदर्शन केल्यावर परिषदेचा समारोप करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांच्या दोनशे रुपये हमीभाव मागण्यासाठी काजू परिषदांचे येत्या काही दिवसात आयोजन करण्यात येणार आहे असे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपस्थित शेतकऱ्यांनी तसेच श्रमिक शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी सुद्धा यामध्ये मार्गदर्शन करण्याची तयारी आहे असे सांगितले.