You are currently viewing व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या पुरस्कारांचे वितरण

व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या पुरस्कारांचे वितरण

व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या पुरस्कारांचे वितरण

इचलकरंजी/प्रतिनिधी –

सर्वच क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. प्रत्येक क्षेत्रात अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण होत असतो. आपण ज्या क्षेत्रात काम करतो, त्या क्षेत्रात आपले योगदान काय तसेच बदलते अर्थकारण आणि तंत्रज्ञान समजून घेऊन आपण त्याला कसे सामोरे जातो. त्यावर आपले अस्तित्व अवलंबून असते. त्यामुळे बदलते अर्थकारण आणि तंत्रज्ञान समजून घेणे आणि अस्तित्व टिकवायचे असेल तर त्यानुसार बदल करणे अपरिहार्य असल्याचे ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांनी सांगितले.

इचलकरंजी येथील व्हॉईस ऑफ मीडिया संघटनाच्या वतीने आणि बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया आणि क्रेडाई इचलकरंजी यांच्या सहकार्याने पत्रकार दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. त्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून
मार्गदर्शन करताना श्री. पवार बोलत होते.
पॉवरलूम क्लॉथ अ‍ॅण्ड यार्न मर्चंटस असोसिएशनच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन आणि दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी, प्रास्ताविकात पत्रकारांच्या समस्या मांडून त्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने प्रयत्न करण्याची मागणी केली. क्रेडाईचे सचिव सम्मेद मगदूम यांनी बांधकाम क्षेत्रातील समस्या मांडून त्या सोडवण्याची मागणी केली.
माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी, जे शासनाला जमत नाही ते संघटना करून दाखवत असल्याचे सांगत संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. शासनाने अधिस्विकृती कायद्यात सुधारणा केली तर पत्रकारांना सुविधा देणे अवघड नाही. त्यामुळे कायद्यात सुधारणा करण्यासाठी पाठपुरावा करत आहे. पत्रकारांच्या कल्याणकारी मंडळासाठी जाहिरातीतून 1 टक्का सेस जमा केला तरी वृत्तपत्र क्षेत्रातील पत्रकारांसह सर्वांनाच सुविधा देता येणे शक्य आहे. म्हाडा अंतर्गत पत्रकारांच्या घरकुलाचाही प्रश्‍न सुटू शकतो, असे सांगितले.
शोध पत्रकारिता योग्य असेल तर समाजापर्यंत योग्य बातमी पोहचते असे सांगत खासदार धैर्यशील माने यांनी यावेळी एक डेमोही सादर केला. जनतेच्या प्रश्‍नाला पत्रकारच वाचा फोडतात. मात्र लोकप्रतिनिधी हा केवळ पॉलिसीमेकर नव्हे तर सोल्युशन मेकरही हवा तरच प्रश्‍न सुटू शकतात. लोकशाही प्रगल्भ होत आहे. वृत्तपत्र क्षेत्रातही बदल होत आहेत. अशा परिस्थिती पत्रकार म्हणून काम करणे हे एक व्रतच आहे. वाईटाला वाईट म्हटले पाहिजे, पण बे्रकींग न्यूजच्या नावाखाली कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे, असे सांगत पत्रकारांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया कार्य करत असून या कार्यात शक्य ती मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट समाजकार्याबद्दल गजानन महाजन गुरुजी, रीटा रॉड्रीग्युस यांना तर सेवाभावी संस्थेचा पुरस्कार माणूसकी फौंडेशनचे रवि जावळे, जीवनमुक्ती सेवा संस्थेचे अनिल घोडके, शिवराणा बहुउद्देशीय संस्थेचे राजतिलक लाहोटी यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास आयुक्त ओमप्रकाश दिवटे, बिल्डर असोशिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष नितीन धूत, व्हॉईस ऑफ मीडियाचे शहराध्यक्ष साईनाथ जाधव, उपाध्यक्ष रविकिरण चौगुले, बाळासाहेब पाटील, निखील भिसे, रोहन हेरलगे यांच्यासह तिन्ही संघटनांचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शेवटी उपाध्यक्ष महेश आंबेकर यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + nineteen =