…त्याचे चिमुकले हात साकारतात कागदी लगद्यापासून इकोफ्रेंडली गणपती
नाधवडेतील पाच वर्षाच्या मेधांश मदभावे कलाविष्कार
कासार्डे : दत्तात्रय मारकड
बाल संगड्यासोबत गाडी! गडी!! करीत खेळण्याच्या वयातील वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील पाच वर्षाचा चिमूरडा आपल्या चिमुकल्या हाताने सफाईदारपणे कागदी लगद्यापासून इकोफ्रेंडली गणपती बाप्पा बनवतो आहे.त्याचा तो कलाविष्कार पाहून भल्याभल्या कलाकारांच्या तोंडून अरे वा!!! छानच,!! असा शब्द निघाल्याशिवाय राहत नाही. लहानपणी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देणारे प्रसंग अनेकदा येऊन जातात.योग्यवेळी मुलांना पालकांनी दाद दिली की मुलांच्या कलेला आणि प्रतिभेला पंख फुटतात.एक विस्मयजनक कलाकृतीची निर्मिती होते.असेच काहिसे घडले आहे नाधवडे – चारवाडीतील ५ वर्षांच्या मेधांश सतीश मदभावे याच्या बाबतीत.
तळेरे येथिल ‘बलोपासना’ या संस्कार वर्गात मातीचा नागोबा करण्यास येऊ लागल्यावर आपल्याला गणपती बनवायचा आहे असा अट्टाहास मेधांशने केला.मेधांशचे आई आणि बाबा तळेरे येथील श्रावणी कंप्युटरचे संचालक श्रावणी व सतिश मदभावे यांनी मेधांशची इच्छा मनावर घेतली आणि मेधांशचे आजोबा मूर्तीकार उदय दुदवडकर यांचे मार्गदर्शन घेऊन मेधांश याने वर्तमानपत्रांच्या कागदांचा लगदा व माती यांपासून सव्वा फूट उंचीची इकोफ्रेंडली( निसर्गमैत्र) गणेशमूर्ती साकारली.
मेधांश सतीश मदभावे याला मूलत: चित्रकला, हस्तकला, मूर्तिकला, कॉम्प्युटरवरचे खेळ यांची आवड आहे.तो तळेरे परिसरात छोटा कम्प्युटर मास्टर म्हणूनही परिचित आहे.
तळेरे येथील बलोपासना या संस्कार वर्गात इतर मुलांसहित मेधांश याला चित्रकलेबरोबर मूर्ती कलेचे मार्गदर्शन संस्कार वर्गाचे गूरुवर्य मूर्तिकार तथा त्याचे आजोबा उदय दुदवडकर यांच्याकडून मिळाले. मेधांश यांच्यां शेजारी नाधवडेतील सुनील मेस्त्री यांची गणेश चित्रशाळा आहे. सुनील मेस्त्री गणपती करीत असताना त्यांच्या त्या कलाकुसरीचे, कलाकृतींचे मेधांश अतिशय सुक्ष्मपणे निरीक्षण करीत असे.कु. मेधांशची आवड व कलाविष्कार पाहून त्याने तयार केलेल्या मूर्तीसाठी सुनील मेस्त्री यांनी रंग व मातीसह इतर साहित्य पुरवून त्याच्या कलेला विशेष दाद दिली.
मेधांशचे आजोबा चंद्रकांत मदभावे यांनीही मेधांश याला प्रोत्साहन दिले. सुरुवातीला मेधांशने सहा छोट्या छोट्या गणेशमुर्त्या बनविल्या. या मुर्त्या चढत्या क्रमाने मोठमोठ्या आकाराच्या बनविलेल्या होत्या. अखेर सातवी मूर्ती ही सव्वा फुटी उंचीची त्याने बनवली व रंगावलीही. त्याने बनवलेली मूर्ती त्याचे आजोबा चंद्रकांत मदभावे यांनी पार्थिव गणेश पूजनासाठी घरी पूजनात ठेवली आहे. मेधांशच्या या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.