You are currently viewing कोकणातील वॉटर स्पोर्ट्स येत्या तीन-चार दिवसात सुरु होणार…

कोकणातील वॉटर स्पोर्ट्स येत्या तीन-चार दिवसात सुरु होणार…

बबन शिंदे यांची माहिती ; मुख्यमंत्री, पर्यटन मंत्र्यांची मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांना सूचना…

मालवण
कोकणातील वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्याबाबत खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधल्यानंतर श्री. ठाकरे व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून येत्या दोन-तीन दिवसात वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्याची परवानगी देण्याची सूचना दिली आहे. अशी माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे यांनी दिली.
ऐन पर्यटन हंगामात मेरिटाईम बोर्डाने वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारल्याने पर्यटन व्यावसायिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. व्यावसायिकांनी बँकांची कर्जे काढून व्यवसाय सुरू केला असून ही कर्जे फेडायची कशी असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी वॉटर स्पोर्ट्स व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली असताना मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या अखत्यारीत कारवाई करण्यास सुरवात केल्याने जोपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांचा व्यवसाय बंद करण्याचा आदेश येत नाही. तोपर्यंत व्यवसाय सुरूच ठेवण्याचा इशारा वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिकांनी दिला आहे.
या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे लक्ष वेधले असता त्यांनी मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत लवकरात लवकर वॉटर स्पोर्ट्सला परवानगी देण्याची सूचना केली आहे. कोरोनाच्या काळात पर्यटन व्यावसायिकांचा व्यवसाय बुडाला असून त्यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे. बँकांची कर्जे वाढत असल्याने वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिकाचा व्यवसाय सुरू होणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट करत याची कार्यवाही येत्या दोन-तीन दिवसात करण्याची सूचनाही मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांना करण्यात आली असल्याची माहिती श्री. शिंदे यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा