मालवण
सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरील वॉटरस्पोर्ट्स व्यवसायिकांचा प्रश्न जटील बनला आहे. मेरिटाईम बोर्डाच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून या प्रश्नी टाळाटाळ होत असल्याने या विषयात माजी मुख्यमंत्री, खा. नारायण राणे यांनी स्वतः लक्ष घातले आहे. खा. राणे यांनी वॉटरस्पोर्ट्स व्यावसायिकांच्या “एसओपी” साठी थेट राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. यावेळी लवकरात लवकर ही “एसओपी” बनवून वॉटरस्पोर्ट्स व्यावसायिकांचे प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही संजय कुमार यांनी दिली आहे. दरम्यान, मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी यांच्याशी देखील खा. राणेंनी संपर्क साधला. कोरोना लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवसाय ठप्प झाले होते. सहाजिकच किनारपट्टीवरील वॉटरस्पोर्ट्स ला देखील बंदी घालण्यात आली होती. मात्र शासनाने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली असून सर्व व्यवसाय टप्प्याटप्प्याने सुरू केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मागील महिन्यात सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी वॉटर स्पोर्ट्स व्यवसाय चालु करण्यासाठी एसओपी (मार्गदर्शक कार्यप्रणाली) बनवून वॉटर स्पोर्ट्सला परवानगी दिली होती. मात्र अलीकडेच महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने पुन्हा एकदा वॉटर स्पोर्ट्स वर बंदी आणली आहे. त्यामुळे या व्यवसायिकांची उपासमार होत असून पर्यटनासाठी ठिकठिकाणहून येथे येणाऱ्या पर्यटकांचीही गैरसोय होत आहे. याबाबत मागील आठ ते दहा दिवस स्थानिक वॉटरस्पोर्ट्स व्यवसायिक मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांची संवाद साधण्याचा प्रयत्न करत असूनही त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. सोमवारी कुडाळ येथे माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांचे पत्रकार परिषदेत याप्रश्नी लक्ष वेधले असता खा. राणे यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. पत्रकार परिषद संपल्यानंतर खा. राणे यांनी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून वॉटर स्पोर्ट्स व्यवसायासाठी एसओपी जाहीर करण्याची सूचना केली. यावेळी श्री. सैनी यांनी हा विषय राज्याचे मुख्य आयुक्त संजय कुमार यांच्याशी संबधीत असल्याचे सांगताच श्री. राणे यांनी संजय कुमार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. यावेळी सिंधुदुर्गातील वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिकांच्या समस्या आणि पर्यटन व्यवसायाचे होणारे नुकसान ही परिस्थिती श्री. संजय कुमार यांच्या निदर्शनास आणून येत तातडीने वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिकांचे प्रश्न सोडविण्याची सूचना केली. त्यानुसार येत्या दोन ते तीन दिवसात ही एसओपी जाहीर करण्याची ग्वाही संजय कुमार यांनी खा. राणे यांना दिली आहे. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, महिला जिल्हाध्यक्ष सौ संध्या तेरसे, रणजित देसाई डॉ. मिलिंद कुलकर्णी, राजू राऊळ, सुनील बांदेकर यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते..