चांगल्या गोष्टींची दखल घेणे पञकारितेसाठी प्रेरणादायी : अलोक जञाटकर
इचलकरंजी : प्रतिनिधी
समाजात जे चांगलं आहे त्याची दखल घेणे हे आजच्या पत्रकारितेसाठी खूपच प्रेरणादायी आहे. विकसित भारताचे स्वप्न पुढे घेवून जाताना देशाची युवापिढी ऊर्जा आहे.अनेक आव्हाने समोर असताना संवाद आणि कल्पकतेची जोड देवून मुलांना प्रेरित करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी अलोक जत्राटकर यांनी केले.
इचलकरंजी प्रेस क्लब व लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन व पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर माजी नगरसेवक नितीन जांभळे, लायन्स क्लबचे अध्यक्ष श्रीकांत सारडा, प्रेस क्लबचे अध्यक्ष मयूर चिंदे, उपाध्यक्ष अरुण काशीद यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे
यावेळी श्री.जत्राटकर यांनी बदलत्या पत्रकारितेसह वास्तव समाज व्यवस्थेवर बोट ठेवला. व्यस्त असणाऱ्या जीवनात अजिबात वेळ वाया जाऊ न देता प्रत्येकाने कुटुंबासाठी वेळ दिला पाहिजे. तुटत असणाऱ्या संवादाचा आता विसंवाद होता कामा नये. मुलांना कल्पकतेशी जोडून शिक्षणाबरोबर कौशल्यही देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
शहरातील पत्रकारांनी प्रबोधनातून औद्योगिक शांतता कायम ठेवली आहे. प्रत्येक गोष्टीची वेळीच दखल घेऊन ते समाजापुढे आणण्याचे काम केले आहे. पत्रकारांना अधिस्वीकृत कार्डसाठी शुद्धीपत्रक काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे माजी आमदार श्री हाळवणकर यांनी मनोगतातून सांगितले. समाजातील सर्वच घटकांना जगासमोर आणण्याची गरज आहे. समाजात सजगता वाढली असून शोध पत्रकारितेला अतिशय महत्त्व आले आहे,असे मत आमदार श्री.आवाडे यांनी व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त व्यक्ती व सामाजिक संस्थांना गौरविण्यात आले. उत्कृष्ट सामाजिक संस्था माहेश्वरी युथ फाउंडेशनचा पुरस्कार सतीश डाळ्या, श्यामसुंदर मर्दा, भूमिपुत्र पुरस्कार डॉ.रविराज शिंदे, अष्टपैलू व्यक्तिमत्व पुरस्कार संजय काशीद, उत्कृष्ट सामाजिक कार्य पुरस्कार प्रा. प्रतिभा पैलवान, क्रीडा पुरस्कार ॲड.जिया शेख तर विशेष पुरस्कारा प्रा.मेजर एम.जे.वीरकर, राजश्री छत्रपती शाहू हायस्कूल दहावी अभ्यास गटाचे राजू नदाफ व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वीकारला.
स्वागत प्रेस क्लबचे अध्यक्ष मयूर चिंदे यांनी तर प्रास्ताविक संजय खूळ यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख दयानंद लिपारे यांनी करून दिली.आभार उपाध्यक्ष अरुण काशीद यांनी मानले. सूत्रसंचालन ऋषिकेश राऊत यांनी केले. लायन्स क्लब सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला पत्रकार, पत्रकार मित्र,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—-