सतीश सावंत यांना सुरेश सावंतांचं आव्हान ; सांगवे सोसायटीच्या बदनामीसाठी शिवसेनेकडून गुंडांचा वापर
सिंधुदुर्ग :
जिल्हा बँकेच्या निवडणूकीसाठी सांगवे सोसायटीमधून मला मतदानाचा अधिकार मिळाल्याने सांगवे सोसायटीला मतदानातून बाद करण्यासाठी बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी शिवसेनेच्या गुंडांमार्फत येथे धान्याचा काळाबाजार होत असल्याचा कांगावा केला. मात्र त्यांचे हे षडयंत्र निकामी ठरले असून हिम्मत असेल तर सतीश सावंत यांनी जिल्हा बँक निवडणुकीत सोसायटी मतदार संघातून उभं राहण्याचं आव्हान भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सुरेश सावंत यांनी दिलं आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सुरेश सावंत यांनी म्हटलं आहे की, सांगवे सोसायटीच्या धान्य दुकानावर भिरवंडे येथील शिवसेनेचे गुंड आणि खुनातील आरोपी घेऊन टेम्पो ड्रायव्हरला धमकी देऊन गाडीची चावी काढून गट सचिव व चेअरमनला धमकी देण्यापेक्षा संचायनी घोटाळेबाज सतीश सावंत यांनी हिम्मत असेल तर सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीत सोसायटी मतदार संघातून उभे रहावे. तिथून पळ काढू नये. त्यांना त्याठिकाणी त्यांची जागा दाखवून देऊ. सांगवे सोसायटीच्या मतदानाचा अधिकार मला दिल्यामुळे सिंधुदुर्ग बँक निवडणूकीमध्ये सतीश सावंत हे आपला पराभव होणार हे नक्की झाल्यामुळे सांगवे सोसायटीचा मतदानाचा अधिकार बाद करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु न्यायदेवतेने त्यांचे हे षडयंत्र हाणून पाडले. सतिश सावंत यांनी कितीही खोटे करण्याचा प्रयत्न केला तरी या जगात न्याय देवता आहे, त्यामुळे संचायनी मधील गोरगरीब लोकांना व शेतकऱ्यांना लुबाडून त्यांच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या सतीश सावंत यांना नियती माफ करणार नाही, असं सुरेश सावंत यांनी म्हटलं आहे.