व्यापारी मेळाव्याचे भाजप नेते नीलेश राणे यांना निमंत्रण
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ पदाधिकारी यांनी घेतली भेट
आवश्यक ते सहकार्य देण्याचे निलेश राणे यांचे व्यापारी बांधवाना आश्वासन
मालवण
मालवण येथे 31 जानेवारी रोजी होणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ मेळाव्यास उपस्थित राहण्याबाबत निमंत्रण जिल्हा व्यापारी महासंघातर्फे माजी खासदार तथा भाजप नेते नीलेश राणे यांना देण्यात आले आहे. यावेळी व्यापारी बांधवांना आवश्यक ते सहकार्य देण्याचे आश्वासन राणे यांनी दिले.
दरम्यान, पाच दिवसांच्या व्यापारी मेळाव्यासाठी एखादा मोठा सांस्कृतिक कार्यक्रम देण्याचे राणे यांनी व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा ३६ वा वार्षिक व्यापारी एकता मेळावा ३१ जानेवारी रोजी मालवणच्या बोर्डिंग मैदानावर होणार आहे. यंदा यजमान मालवण व्यापारी संघाच्या स्थापनेचे सुवर्णमहोत्सवी वर्षही आहे. हे औचित्य साधून २७ ते ३० जानेवारी या कालावधीत व्यापार व पर्यटन प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात येणार आहे. जिल्हयातील व्यापारी बांधवांच्या एकजुटीचे प्रतिक म्हणून साजरा होणाऱ्या या व्यापारी एकता मेळाव्याला सिंधुदुर्गचे सुपुत्र व उद्योजक या नात्याने प्रमुख मान्यवर निमंत्रित म्हणून प्रत्यक्ष सहभागी व्हावे, अशी विनंती महासंघातर्फे निलेश राणेंना करण्यात आली.
यावेळी मालवण शहर अध्यक्ष उमेश नेरुरकर, उपाध्यक्ष अशोक सावंत, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, नाना साईल, अरविंद ओटवणेकर, नितीन तायशेटये, प्रसाद धारगळकर, परशुराम पाटकर, हर्षल बांदेकर, खजिनदार गणेश प्रभुलकर, विजय केनवडेकर, सहसचिव अभय कदम, सरदार ताजर, अमोल केळुसकर, हरेश देऊलकर, अखिलेश शिंदे, संभव कुडाळकर, राजेश पारकर, अमित कारेकर, कुलराज बादेकर आदी उपस्थित होते.
व्यापारी मेळाव्यात मोठा सांस्कृतिक कार्यक्रम निश्चित होईल
मेळाव्याच्या निमित्ताने महाराष्ट्राची हास्यजत्रा धर्तीवर एक मोठा सांस्कृतिक कार्यक्रम देण्यासंदर्भात राणे यांनी व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. व्यापारी मेळाव्यात एक मोठा सांस्कृतिक कार्यक्रम निश्चित होईल. व्यापारी बांधवांच्या मेळाव्याला आपणाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असेही राणे यांनी स्पष्ट केले.