कणकवली पर्यटन महोत्सवात विविध कार्यक्रमांची कणकवलीकरांना मेजवानी – माजी नगराध्यक्ष समीर नलावडे
कणकवली पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन नामदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार
कणकवली
यावर्षीचा कणकवली पर्यटन महोत्सव हा ११ जानेवारी ते १४ जानेवारी या कालावधीत होत आहे. या पर्यटन महोत्सवाचे ११ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आ.नितेश राणे, माजी आ.प्रमोद जठार,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या उपस्थितीत होणार आहे. तर समारोप केंद्रीय मंत्री नारायण राणे, ना.गिरीश महाजन, युवा नेते निलेश राणे, आ.नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत १४ जानेवारी रोजी होणार आहे. सलग चार दिवस या महोत्सवानिमित्त नामवंत कलाकार कणकवलीत हजेरी लावणार असून विविध कार्यक्रमांची कणकवलीकरांसाठी एक खास मेजवानीच लाभणार आहे. अशी माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
कणकवली येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेवक संजय कामतेकर, भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे, राजा पाटकर, पंकज पेडणेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
समीर नलावडे म्हणाले, ११ जानेवारी रोजी पहिल्या दिवशी संगीत संध्या ‘रेट्रो टू मेट्रो’ व ‘फु बाई फु’ फेम कलाकारांचा कार्यक्रम होणार आहे.शशांक कल्याणकर यांचा ऑर्केस्ट्रा व नामवंत ७ कलाकार असणार आहेत. फु बाई फु फेम सागर कारंडे, हेमांगी कवी यांची कॉमेडी पहायला मिळणार आहे.तर १२ जानेवारीला ‘आम्ही कणकवलीकर’ यांचा कणकवली व लगतच्या गावातील कलाकारांचा सुहास वरुणकर, प्रा.हरिभाऊ भिसे प्रस्तुत ३०० नामवंत कलाकारांसहित संगीत,नृत्य,व कॉमेडी असा रंगतदार कनकसंध्या कार्यक्रम व पदर प्रतिष्ठान महिलांचा कार्यक्रम होईल.
१३ जानेवारीला ८ वाजता इंडियन आयडॉल फेम सायली कांबळे,आशिष कुलकर्णी,निहाल तौरो या नामवंत कलाकारांचा हिंदी – मराठी गाण्यांचा भव्य कार्यक्रम, तर १४ जानेवारीला या पर्यटन महोत्सवाचा ९ वाजता समारोप होईल. त्यानिमित्त प्लेबॅक सिंगर दिव्यकुमार , नचिकेत लेले, चेतना भारद्वाज व संचिता गर्गे यांचा ऑर्केस्ट्रा असणार आहे. कणकवलीकरांनी या कणकवली पर्यटन महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समीर नलावडे यांनी केले आहे.