वेंगुर्ले :
उभादांडा – नवाबाग येथील श्री देव घुमटेश्वर पुनःप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा ५ ते ८ जानेवारी दरम्यान संपन्न होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज ५ जानेवारी रोजी नवाबागवाडी मुख्य रस्त्यापासून ग्रामदेवता पाषाण मूर्ती व कलशाची सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत कालवीबंदर येथील श्री विठ्ठल रखुमाई वारकरी भजन मंडळाचे दिडी भजन आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नवाबाग येथे या सोहळ्यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. पाषाण मूर्तीचे आगमन झाल्यानंतर मंदिरात ब्राह्मणांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम सुरू झाले आहेत. सायंकाळी राक्षोघ्न होम संपन्न झाला. दरम्यान उद्या दि. ६ जानेवारी रोजी सकाळी ७ पासून धार्मिक विधी, सायं. ६ वा. महाआरती, ७ वा. ब्राह्मण प्रासादिक मंडळ भेंडमळा यांचे भजन, रात्रौ ८.३० वा. ह.भ.प.शरदबुवा घाग (नृसिहवाडी) यांचे ‘भक्त हरिपाल‘ यावर किर्तन, दि. ७ जानेवारी रोजी सकाळी ७ पासून धार्मिक विधी, सायं. ४ वा. सक्राळ-गोवा येथील ब्राह्मण घुमट आरती भजन मंडळाची घूमट आरती, सायं. ६ वा. महाआरती, सायं. ७ वा. केपादेवी प्रासादिक मंडळाचे वारकरी भजन, रात्रौ ८.३० वा. ह.भ.प.दत्तात्रय उपाध्ये (वालावल) यांचे ‘रूक्मिणी स्वयंवर‘ यावर कीर्तन, दि. ८ जानेवारी रोजी सकाळी ९ वा. ह.भ.प.हरेकृष्ण पोळजी महाराज (आसोली) यांच्या हस्ते ‘शिखर कलश प्रतिष्ठापना‘, १०.४६ मि. या शुभमुहूर्तावर श्री देव घुमटेश्वर देवता स्थापना, देवतेची प्राणप्रतिष्ठापूर्वक महापूजा, धार्मिक विधी, नैवेद्य, आरती, महाप्रसाद, सायं. ६ वा. महाआरती, सायं. ७ वा. मुळपुरूष धावडेश्वर मंडळाचे वारकरी भजन, रात्रौ ८.३० वा. ह.भ.प.शरदबुवा घाग (नृसिहवाडी) यांचे ‘श्रीराम गंगापार‘ यावर कीर्तन होणार आहे. तरी भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा व कार्यक्रमांचा लाभ घ्याव असे आवाहन श्री देव घुमटेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट, देवस्थान स्थानिक सल्लागार समिती आणि समस्त नवाबागवाडी ग्रामस्थ यांनी केले आहे.