वेंगुर्ला :
परुळे चेअरमन तथा कुशेवाडी सरपंच निलेश सामंत यांनी आज परुळे येथील रास्त दर धान्य दुकानदार कर्मचारी संघटनेच्या सभेत धान्य दुकानदार कर्मचाऱ्यांच्या संपास पाठिंबा दर्शविला. या कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी संप पुकारला. तो योग्य आहे. या संपास संस्था चेअरमनचा पूर्ण पाठींबा आहे. अजूनही काही मदत लागली असल्यास संघटनेने निर्भयपणे सांगावे त्यासाठी लागेल ती मदत आम्ही संस्था चेअरमन व सरपंच या नात्याने तुम्हाला देवू असे जाहीर केले. परुळे येथील सेल्समन जयवंत राऊळ यांनी परुळे येथील वराठी मंगल कार्यालयात आयोजित केलेली वेंगुर्ला तालुका रास्त भाव धान्य दुकानदार कर्मचारी संघटना यांची सभा दि. ३ जानेवारी रोजी परुळे संस्था चेअरमन तथा कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, परुळे व्हाईस चेअरमन प्रसाद पाटकर, भोगवे संस्था चेअरमन चेतन सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत व वेंगुर्ले रास्त भाव धान्य दुकान कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
सभेच्या सुरवातीस रास्त भाव धान्य दुकान संघटनेचे तालुका अध्यक्ष तात्या हाडये यांनी मान्यवर श्री. सामंत, श्री. पाटकर, श्री. चेतन सामंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. श्री. निलेश सामंत म्हणाले, गेली कित्येक वर्षे मी पहातो, वर्तमानपत्रात वाचतो, श्री. तात्या हाडये संस्थाच्या फायद्यासाठी झटत असतात. या वयातही त्यांनी आज पुढाकार घेतला. जरी आमचे नुकसान झाले तरी भावी पिढीत संस्था कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शासनाच्या ज्या ज्या योजना सवलती आहेत, त्या धान्य दुकानातील कर्मचाऱ्यांना सुद्धा मिळाव्यात हे माझे प्रामाणिक मत आहे. भोगवे चेअरमन श्री. चेतन सामंत यांनी, आज धान्य दुकानदार कर्मचारी संघटना आपल्यासाठी संस्थांकडे काहीच मागत नाहीत, त्यांचा शासनाबरोबर लढा आहे तो संस्थांना योग्य मार्जिन (कमिशन) मिळावे, नेट सर्व्हरचा प्रॉब्लेम दूर करावा, नविन मशिन द्याव्यात, धान्य व्यवस्थित मोजून व योग्य प्रतिचे द्यावे. इष्टांक वाढवून जे रेशन कार्ड धारक अजूनही धान्यापासून वंचित आहेत त्यांना शासनाने धान्य मिळवून द्यावे. अशा अनेक मागण्या आहेत. ते योग्य आहे. असे स्पष्ट केले. यावेळी वजराटचे सेल्समन रविंद्र पेडणेकर यांनी, आम्ही सर्व धान्य दुकानदार कर्मचारी यांचा आमचे अध्यक्ष श्री. तात्या हाडये यांना बिनशर्त पाठींबा आहे. आज त्यांची आम्हा सर्वांसाठी तळमळ फार मोलाची आहे. अर्थात मागे हटून चालणार नाही असे स्पष्ट केले. या सभेत जिल्ह्याबरोबर देशव्यापी संपाबरोबर मागण्या पूर्ण होईपर्यंत एकनिष्ठेने राहण्याचा सर्वांनी निर्णय सर्वानी घेतला. तसेच सर्व संस्था, ग्रामपंचायत, बचत गट यांनी सुध्दा पाठींबा देऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.यावेळी जेष्ठ रास्त भाव धान्य दुकानदारांचा परुळे संस्था चेअरमन तथा कुशेवाडा सरपंच निलेश सामंत यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभाराचे काम वजराटचे सेल्समन रवींद्र पेडणेकर यांनी पाहिले. यावेळी 3 ते 4 धान्य दुकानदार कर्मचारी घरगुती अडचणीमुळे येऊ शकले नाहीत. इतर सर्व कर्मचारी सभेला उपस्थित होते.