पाठवणी लेकीची…
बाप-मुलीच्या नात्याचे,
गुंतलेले असतात धागे.
उलगडायला गेलं तरी,
बनून राहतात आठवणी.
म्हणून तर जड जाते,
बापाला… पोरीची पाठवणी.
बालपणीचे तिचे हट्ट,
पुरवायचा बाप हसत हसत.
तिच्या चेहऱ्यावरच्या हास्याने,
होई मन त्याचे समाधानी,
म्हणून तर जड जाते,
बापाला…पोरीची पाठवणी.
नाजूक तिचा हात अलगद,
फिरतो बापाच्या गालावरून.
गळा पडलेली तिची मिठी,
हीच तर बापासाठी पर्वणी.
म्हणून तर जड जाते,
बापाला…पोरीची पाठवणी.
आईपेक्षाही बाप असतो,
पोरीसाठी जास्त जवळचा.
तिची सर्व गुपितं, गोष्टी,
बाप ऐकतो आपल्या कानांनी.
म्हणून तर जड जाते,
बापाला…पोरीची पाठवणी.
बापासाठी पोरगी असते,
हिऱ्या मोत्याचा दागिना.
संस्कारांचे पैलू पाडी,
बाप नावाची हिरकणी.
म्हणून तर जड जाते,
बापाला…पोरीची पाठवणी.
अक्षता पडता मांडवात,
लेक, सून परक्यांची होते.
हात हातातून सुटता लेकीचा,
पाहतो बाप भरल्या डोळ्यांनी.
म्हणून तर जड जाते,
बापाला…पोरीची पाठवणी.
तिच्या आठवणींचा पाऊस,
कोसळतो बापाच्या हृदयावर.
न्हाऊन निघतं अंग अंग,
बापाचं अश्रूंच्या धारांनी.
म्हणून तर जड जाते,
बापाला…पोरीची पाठवणी.
(दीपी)🖋️
८४४६७४३१९६