You are currently viewing माजी नगराध्यक्ष बबनराव साळगावकर पुन्हा सक्रिय.

माजी नगराध्यक्ष बबनराव साळगावकर पुन्हा सक्रिय.

बॅकफूट वर असलेल्या सिंधुदूर्ग राष्ट्रवादीला मिळणार ऊर्जा

संपादकीय….

राजकारणातील स्वच्छ प्रतिमा असलेले आणि निष्कलंक व्यक्तिमत्त्व म्हणजे सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष प्रेमानंद उर्फ बबन साळगावकर. नगराध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन विधानसभेच्या स्पर्धेत उतरले हीच आयुष्यातील सर्वात मोठी चूक. अन्यथा बबनराव म्हणजे स्पष्टवक्तेपणा आणि सामाजिक जाणिव असलेला सर्वसामान्यांचा नेता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सावंतवाडीच्या शिवाजी चौकात साखर वाटत बबनराव साळगावकर हे पुन्हा सक्रिय राजकारणाच्या मैदानात मोठ्या दिमाखात उतरलेले आहेत. बबनराव सावंतवाडी नगरपलिकेतील पोटनिवडणुकी नंतर राजकारणापासून काहीसे अलिप्त होते. राजकारणाचा दांडगा अनुभव आणि गेली कित्येक वर्षे राजकारणात असूनही स्वच्छ राजकारणी म्हणून असलेली त्यांची प्रतिमा हीच त्यांची जमेची बाजू.
भाजपच्या हातात असलेली राज्यातील सत्ता अलिबाबाच्या गुहेत शिरून आपल्या हाती घेण्याची जर कोणी किमया केली असेल तर ती राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी. महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर आली ती केवळ शरद पवारांच्या करिष्म्यावरच. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादीला दीपक केसरकर यांनी रामराम केल्यावर जे ग्रहण लागलं ते आजपर्यंत सुटलेलं नाही. सुरेश गवस यांनी काहीकाळ राष्ट्रवादीच्या तंबूला बऱ्यापैकी आधार दिला होता. अगदी पदरमोड करून पक्षासाठी काम करत होते. त्यानंतर पुणे जिल्हा बँकेच्या अर्चना घारे-परब यांनी निरीक्षक म्हणून पक्षासाठी उल्लेखनीय कार्य केले होते. पण विधानसभेच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी पुन्हा एकदा बॅक फुटवर गेली. आज जिल्हा राष्ट्रवादी जिल्ह्यात मित्रपक्षांपेक्षा मागे आहे त्यामुळे येत्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ज्या जागा पदरात पडतील त्या लढवून आपली ताकद वाढविण्याच्या प्रयत्नात आहे.
जिल्ह्यात शरद पवार यांचे आजही वलय आहे. त्यांच्या शब्दाला कार्यकर्त्यांच्या लेखी मान आहे. परंतु जिल्ह्यातील राष्ट्रवादी संघटनात्मक दृष्ट्या इतरांपेक्षा मागे आहे, त्यामुळे बबन साळगावकरांसारखे अनुभवी नेतृत्व सक्रिय झाल्यास जिल्हा राष्ट्रवादीची ताकद वाढून राष्ट्रवादीला अच्छेदिन आल्याशिवाय राहणार नाहीत. येत्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बबनराव साळगावकर यांचे राजकारणात सक्रिय होणे नक्कीच पक्षासाठी फायद्याचे ठरणार आहे आणि स्वतः बबनराव साळगावकर यांच्यासाठी देखील जुन्या गोष्टी विसरून नवी इनिंग सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा