You are currently viewing इचलकरंजी प्रेस क्लबचे पुरस्कार जाहीर

इचलकरंजी प्रेस क्लबचे पुरस्कार जाहीर

माय फाउंडेशन, संजय काशीद, डॉ.रविराज शिंदे यांच्यासह सात जणांना पुरस्कार

 

७ जानेवारी रोजी पुरस्काराचे वितरण..

 

इचलकरंजी : प्रतिनिधी

पत्रकार दिनानिमित्त इचलकरंजी प्रेस क्लबच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची घोषणा आज करण्यात आली. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माहेश्वरी युथ फाऊंडेशन(माय फाऊंडेशन) , अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले संजय काशीद, अन्नधान्य तपासणी बाबत जागतिक स्तरावरील संशोधन करणारे इचलकरंजीचे सुपूत्र डॉ.रविराज शिंदे यांच्यासह सात जणांना यावर्षी गौरवण्यात येणार आहे. इचलकरंजी प्रेस क्लबचे अध्यक्ष मयूर चिंदे, उपाध्यक्ष अरुण काशीद व निवड समिती प्रमुख संजय खूळ यांनी या पुरस्काराची घोषणा केली.

इचलकरंजी प्रेस क्लब व लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ७ जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी या पुरस्काराचे वितरण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे जनसंपर्क अधिकारी अलोक जत्राटकर यांच्या प्रमुख हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. लायन्स क्लब सभागृह येथे सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होईल.

इचलकरंजी प्रेस क्लबच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येतो. यावर्षी उत्कृष्ट सामाजिक संस्था म्हणून माहेश्वरी युथ फाऊंडेशन इचलकरंजी या संस्थेची निवड करण्यात आली आहे. गेली आठ वर्षे या फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक गरजूंना मदतीचा हात देण्याबरोबरच अनेक वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक उपक्रम या फाउंडेशनच्या वतीने राबवली जातात. कला, संस्कृती जपत समाजातील अनेक वंचित घटकांसाठी आपले आयुष्य वेचणारे रोटरी मूकबधिर विद्यालयाचे माजी कलाशिक्षक संजय काशीद यांनाही यावर्षी गौरविण्यात येणार आहे. तृतीयपंथीयांच्या जीवनावर अभ्यास करून त्यावर पुस्तक लिहिणारे तसेच अनाथ, ज्येष्ठ, वंचित घटकांसाठी कार्यरत असलेल्या कन्या महाविद्यालय इचलकरंजीच्या प्रा.प्रतिभा पैलवान यांना उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार देण्यात येणार आहे. तर इचलकरंजी शहरातील पहिली  हाफआयर्न मॅन लेडी ठरलेली

ॲडव्होकेट जिया शेख यांचा क्रीडा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. इचलकरंजी महानगरपालिकेच्या राजर्षी शाहू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना नेहमी प्रोत्साहित करून अनेक मुलांना शैक्षणिक कार्यासाठी मदत करणाऱ्या राजर्षी शाहू हायस्कूल दहावी अभ्यास गट तसेच इचलकरंजीतील अनेक युवकांना अधिकारी बनवण्यात महत्त्वाचे योगदान देणारे डिकेएएससी कॉलेजमध्ये यापूर्वी कार्यरत असणारे मेजर प्रा. एम. जे. वीरकर यांचा विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

इचलकरंजी शहरात जन्मलेले परंतू बाहेर जाऊन शहराचे नावलौकिक करणाऱ्या एका व्यक्तीचा भूमिपुत्र पुरस्काराने गौरव करण्यात येतो. यावर्षीचा हा पुरस्कार डॉ.रविराज शिंदे यांना देण्यात येणार आहे.

इचलकरंजीच्या यंत्रमाग कामगाराचा मुलगा असणारे डॉ. रविराज यांनी अन्नधान्यातील रासायनिक मात्रेचे प्रमाण शोधणारी वैशिष्टपूर्ण पद्धत विकसित केली आहे. अॅग्रोकेमिकल्स अँड पेस्ट मॅनेजमेंटमध्ये संशोधन केलेल्या डॉ. रविराज चंद्रकांत शिंदे यांची ए.ओ.ए.सी. इंटरनॅशनल, मॅरीलॅड, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ने “टेस्टिंग फोर लाईफ” ह्या जागतिक पुरस्कारासाठी निवड केली आहे. हा जागतिक पुरस्कार मिळवणारे डॉ.रविराज शिंदे हे पहिले भारतीय संशोधक विद्यार्थी आहेत.डाॅ. रविराज यांनी संशोधनामधे तृणधान्य, डाळी, शेंगदाणे, काजू व त्यापासून प्रक्रिया केलेल्या उत्पादनामधे रसायनांच्या उर्वरित अंश तपासणी साठीच्या नवीन पद्धती विकसित केल्या  आहेत. ज्यासाठी कमी खर्च व कमी वेळ लागतो. यामुळे शेतक-यांना आयात किंवा निर्यात करताना मदत होणार आहे.रविराज यानी इचलकरंजीच्या ए. एस.सी. महाविद्यालयात रसायनशास्त्र मध्ये पदवी तर शिवाजी विद्यापीठात अॅग्रोकेमिकल्स अँड पेस्ट मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

यावेळी इचलकरंजी प्रेस क्लबचे सचिव राजू होळकर ,खजिनदार शैलेंद्र चव्हाण, सदस्य दयानंद लिपारे, शरद सुखटणकर, सुनील मनोळे, बाळासाहेब पाटील, सागर बाणदार, रविकिरण चौगुले, संतोष काटकर, ऋषिकेश राऊत, संदीप जगताप, अमर चिंदे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा