You are currently viewing जिल्ह्यात मनसेच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा पक्षाला जय महाराष्ट्र..!

जिल्ह्यात मनसेच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा पक्षाला जय महाराष्ट्र..!

जिल्ह्यात मनसेच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा पक्षाला जय महाराष्ट्र..!

प्रसाद गावडे, आशिष सुभेदार व विनोद सांडव तर मनसे रस्ते आस्थापना इंजिनियर सेलचे जिल्हा संघटक अमोल जंगले यांचीही पक्षाला सोडचिट्ठी

मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव,विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार व रस्ते आस्थापना सेलचे जिल्हा संघटक अमोल जंगले यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मनसेच्या या प्रमुख सक्रिय कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिल्याने जिल्ह्यात मनसेला मोठं खिंडार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या चारही पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात असे नमूद केले आहे की,आपल्या विचारांनी प्रभावित होऊन पक्ष संघटनेत सहभागी होत पदाधिकारी म्हणून काम करत असताना पक्षाची ध्येय धोरणे, आंदोलने व मराठी अस्मिता जपण्यासाठीचे पक्षाने घेतलेले विविध उपक्रम अगदी प्रामाणिकपणे व निष्ठापूर्वक राबवून ते तन-मन-धन खर्च करून तळागाळापर्यंत पोहचवले. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय पटलावर सक्षम विरोधी पक्ष म्हणून कायम जनतेची भूमिका मांडत सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम अग्रक्रमाने केले. विविध विषयांवर आक्रमकपणे आंदोलने करून पिडीत जनतेला न्याय मिळवून देण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले.मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील वर्षभराच्या कालावधीपासून पक्ष निरीक्षकांकडून द्वेष भावनेतून जे पक्षांतर्गत गटातटाचे गलिच्छ राजकारण चालू केले आहे व त्यातून झालेली पक्ष संघटनेची हानी पाहता पडत्या काळात कट्टर महाराष्ट्र सैनिकांनी दाखवलेली निष्ठा “बडव्यांनी” पार धुळीस मिळवून टाकली आहे. पक्षात सक्रीय काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून आपल्या मागे-पुढे करणाऱ्या व मर्जी राखणाऱ्या तसेच विमानतळावर बॅगा उचलणाऱ्या हातात पक्ष संघटना देत उरली सुरली ताकद संपवण्याचा जणू विडाच काही “बडव्यांनी” उचलला आहे. जिल्ह्यात विविध गंभीर गुन्ह्यांखाली डागाळलेल्या चेहऱ्यांना पदे बहाल करून पक्षाची प्रतिमा मलिन केली गेली आहे हे उघड्या डोळ्यांनी आता पाहवत नाही.ज्या पक्षात कोणत्याही स्वार्थाशिवाय व पक्षाकडून कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना इतकी वर्षे तळमळीने काम केले त्या पक्ष संघटनेत काही नादान व स्वार्थी पदाधिकाऱ्यांकडून चालवला गेलेला बालिशपणा व मुजोरी ही भविष्यात संघटनेस हानिकारक ठरणार आहे. सन २००५ साली विठ्ठला भोवती जमलेल्या “ज्या” बडव्यांमुळे आपल्यावर बाळासाहेबांची साथ सोडून शिवसेना सोडायची पाळी आली ; दुर्दैवाने आज देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश महाराष्ट्र सैनिकांवर तीच वेळ आली आहे. मागील जवळपास तीन वर्षे आमच्या भावना पक्षाच्या नेत्यांमार्फत आपल्यापर्यंत पोहचवल्या खऱ्या, मात्र काही बडव्यांनी आपल्या भोवती असे काही “चक्रव्ह्यूह” बनवले आहे की आमच्यासारखे कित्येक अभिमन्यू त्यात धारातीर्थी पडले तरी ते चक्रव्ह्यूह भेदले जाणार नाही व या बडव्यांनी लावलेली संघटनेची वाट आपल्यापर्यंत पोहचवली जाणार नाही असे आम्हांस आता कळून चुकले आहे.असो, आपण मनसे पक्षात जी संधी दिलीत व त्यामुळे जिल्ह्याच्या सामाजिक व राजकीय पटलावर नावारूपास आलो त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आमचाही विठ्ठल बडव्यांनी घेरला गेला असल्यानेच ह्या मुजोरी कार्यपद्धतीला कंटाळून आम्ही पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आज रोजी राजीनामा देत आहोत असे नमूद करत पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे.दरम्यान यानंतर मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर काय भूमिका घेतात याची उत्सुकता लागली असून पुढील पंधरा दिवसांत जिल्ह्यातील बहुतांश पदाधिकारी पक्षाला राम राम करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 16 =