You are currently viewing आचरा खुडी-देवगड गाडीला झालेल्या अपघातात चालक वाहकासह प्रवासी जखमी

आचरा खुडी-देवगड गाडीला झालेल्या अपघातात चालक वाहकासह प्रवासी जखमी

आचरा खुडी-देवगड गाडीला झालेल्या अपघातात चालक वाहकासह प्रवासी जखमी

रस्ता सोडून खाली घराला धडकली

मालवण

आचरा येथून दुपारी दोनच्या सुमारास खुडी मार्गे देवगडला जाणाऱ्या गाडीच्या वाहकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने एसटी बस रस्ता सोडून पोयरे गोंदापूर येथील संजय सावंत यांच्या घराला धडकली. ही घटना दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थ प्रकाश पालव, दिपक अपराज, नितीन जोईल, अमर अपराज, प्रथमेश पालव, किशोर पालव, पोयरे उपसरपंच समिर तावडे, संजय सावंत, मंगेश पालव यांसह पंधरा सोळा ग्रामस्थांनी धाव घेत बसमध्ये अडकलेल्या वाहकाला लोखंडी पाराने दरवाजा तोडत बाहेर काढले. उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे आणण्यात आले होते. यात घराची भिंत काही प्रमाणात कोसळून गाडी भिंतीला अडकून एकाबाजूला तोललेली राहीली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. चालक बापू लक्ष्मण काळे रा. तळेरे यांना जास्त दुखापत झाल्याने उपचारासाठी त्यांना ओरोसला हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले. तर वाहक राजेंद्र मनोहर जाधव, प्रवाशी रुही दिनानाथ पडवळ (वय – २१), मिताली प्रविण मुणगेकर (वय – १९) दोन्हीही रा. कुडोपी यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे डॉ. एस. बी. जाधव, डॉ. कपिल मेस्त्री यांच्याकडून उपचार करण्यात आले.
ग्रामस्थांच्या मते गाडीत शाळेतील विद्यार्थ्यांसह अन्य मिळून २२, २३ प्रवाशी असल्याचे सांगितले जात होते. या गाडीतून प्रवास करणारे पोयरे गोंदापूर येथील लक्ष्मण दुखंडे यांनी रस्त्याकडेला खड्डा खणून ठेवण्यात आलेल्या मातीच्या ढिगावर एसटीचे चाक गेल्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर कदम, हवालदार स्वप्नील ठोंबरे यांनी गोंदापूर येथे येत घटनेचा पंचनामा केला. तर देवगड एसटी महामंडळाचे आगार व्यवस्थापक निलेश लाड, स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर यांनी धाव घेतली होती. अपघातानंतर गाडीतील प्रवाशांना नातेवाईकांनी वाहनाने घरी नेल्यामुळे अन्य जखमींबाबत माहिती समजू शकली नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा