ओबीसी समाजाच्या प्रश्नावर जानेवारीत “जनजागरण” सभा – नितीन वाळके
१६ समाजांचे अध्यक्ष उपस्थित राहणार…
सिंधुदुर्ग
ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघ यांच्या माध्यमातून जनजागरण सभा आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती संघाचे पदाधिकारी नितीन वाळके यांनी दिली. दरम्यान सभेला राज्यातून ओबीसी समाजाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे यावेळी १६ समाजांचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या प्रश्नांबाबत सिंधुदुर्ग जिल्हा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी व आरक्षण समाज महासंघ सिंधुदुर्गच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच सिंधुदुर्गनगरी येथे पार पडली. या बैठकीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६ समाजांचे अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत प्रामुख्याने वैश्यवाणी, दैवज्ञ सोनार, तेली तसेच कुंभार समाजाच्या नावांमध्ये अडचणींविषयी चर्चा झाली. स्वतंत्र बैठक मागासवर्गीय आयोगासमोर घेण्यात येईल, असे आश्वासन यावेळी जिल्हा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिले.
यावेळी कार्याध्यक्ष रमण वायंगणकर, सरचिटणीस ॲड. नंदन वेंगुर्लेकर, काका कुडाळकर, खजिनदार बाळा बोर्डेकर, आनंद मेस्त्री, चंद्रकांत कुंभार, बाळ कनयाळकर, राजू पनवेलकर, महेश परुळेकर, मनोहर सरमळकर, सचिन पाटकर, दत्ताराम हिंदलेकर, रमेश बोंद्रे, डॉ. सतीश पवार, भरत आळवे, विकास वैद्य आदी उपस्थित होते.