दारू वाहतूक प्रकरणी एक्साईजच्या कारवाईत सावंतवाडीतील एक ताब्यात
दारू आणि कारसह साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त…
सावंतवाडी
बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाकडून सावंतवाडी येथील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. चेतन पुरूषोत्तम देऊलकर (वय २९) रा. जुनाबाजार सावंतवाडी असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून ३ लाख २६ हजाराच्या दारूसह ४ लाख ५० हजाराची कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई काल रात्री दिड वाजण्याच्या सुमारास आरोसबाग तिठा परिसरात करण्यात आली.
यातील संशयित हा बेकायदा गोवा बनावटीची दारू घेवून येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाला अज्ञाताकडून देण्यात आली होती. त्यानुसार पथकाने आरोसबाग परिसरात सापळा रचला. यावेळी देऊलकर हा संशयास्पदरित्या गाडी घेवून येताना दिसला. यावेळी त्याच्या गाडीची तपासणी केली असता गाडीत हा मुद्देमाल आढळून आला. या प्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी संजय मोहिते, तानाजी पाटील, प्रदिप रासकर, गोपाळ राणे, दिपक वायदंडे यांच्या पथकाकडून करण्यात आली. याबाबतचा अधिक तपास तानाजी पाटील करीत आहेत.